
आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथे गुरुवारी झालेल्या मतदानात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक विक्रम केला. या तिन्ही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात महिलांचे मतदान प्रमाण केवळ उच्चांकीच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले.
पुदुच्चेरीमध्ये तब्बल 91.4 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, तर आसाममध्ये 86.5 टक्के आणि केरळमध्ये 81.2 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. याउलट पुरुषांचे मतदान प्रमाण पुदुच्चेरीत 88.1 टक्के, आसाममध्ये 85.3 टक्के आणि केरळमध्ये 75.1 टक्के इतके नोंदवले गेले.
महिला आणि पुरुष मतदानातील फरक केरळमध्ये सर्वाधिक दिसून आला. येथे हा फरक सुमारे 6 टक्क्यांच्या आसपास होता. पुदुच्चेरीत हा फरक 3.2 टक्के, तर आसाममध्ये केवळ 1.1 टक्के इतका होता. महिलांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे तिन्ही ठिकाणी एकूण मतदानाची टक्केवारीही वाढली.
दरम्यान, राजकीय पक्षांनीही महिलांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनाम्यांमध्ये विविध आश्वासने दिली आहेत. केरळमध्ये एलडीएफने महिलांचा कार्यबलातील सहभाग 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे, तर यूडीएफने महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा देण्याचे आश्वासन जाहीर केले आहे.


























































