
IPL मधला ‘दादा’ संघ म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि पाच वेळा विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था सध्या बिकट आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्यांना सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. सध्या संघ गुणतालिकेत अवघ्या दोन गुणांसह आठव्या स्थानावर असून, अशा कठीण परिस्थितीत स्टार फलंदाज रोहित शर्माची दुखापत संघासाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या 12 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात 241 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, 13 चेंडूत 19 धावांवर असताना त्याला ‘हॅमस्ट्रिंग’चा (स्नायूचा) त्रास जाणवू लागला. फिजिओची मदत घेऊनही आराम न मिळाल्याने त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदान सोडावे लागले. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, रोहितच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात येणार असून, त्या अहवालानंतरच तो 16 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
पैशांचा महापूर! T-20 World Cup 2026 साठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर, ICC ची मोठी घोषणा
या हंगामात रोहित शर्माच्या बॅटमधून आतापर्यंत केवळ एक अर्धशतक (कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध) आले आहे. चार सामन्यांत त्याने एकूण 137 धावा केल्या असून, मागील काही सामन्यांत तो स्वस्तात बाद झाला आहे. मुंबई इंडियन्सला आपला पुढचा सामना 16 एप्रिलला घरच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे, मात्र रोहितच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
IPL 2026 – मुंबईची चिंता वाढली, सलग पाचव्या लढतीत जसप्रीत बुमराहच्या विकेटची पाटी कोरी


























































