
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात फोनद्वारे आयपीएलवर सट्टा खेळवण्यात येत असताना कारवाई करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात चारजणांना अटक केली आहे. 13 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील अंबेजोगाई रोड परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असताना पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. एका चारचाकी वाहनामध्ये बसून सट्टा चालविणार्या चार जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सचीन प्रकाश वलसे (47) रा. मयूरवन, अंबेजोगाई रोड, लातूर. किरणकुमार अर्जुन केंद्रे ( 41) रा. कृपा सदन रोड, गणेश मेडिकल जवळ, लातूर.गंगाधर रामराव घाडगे ( 51) वर्षे रा. होळी, ता. लोदगा, जि. लातूर.मनीष श्रीकांत पंचाक्षरी (37) रा. खडक हनुमान, दयाराम रोड, लातूर यांचा समावेश आहे.
विविध कंपन्यांचे मोबाईल फोन,एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा व्यवहाराच्या नोंदी, क्रेटा चारचाकी वाहन असा एकूण 13,73,090/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी हे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ‘सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स’ या सामन्यावर सट्टा घेत असल्याचे उघड झाले आहे. ते मोबाईल फोन व ऑनलाइन माध्यमांचा वापर करून ग्राहकांशी संपर्क ठेवत सट्टा व्यवहार करत होते.सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने,जमीर शेख यांनी केली आहे.
























































