
बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुक आहेत. ‘जवान’च्या प्रचंड यशानंतर, किंग खान पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. ४०० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २०२६ च्या ख्रिसमस वीकेंडमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘किंग’बद्दलची उत्सुकता इतकी आहे की, पाच महिन्यांपूर्वी त्याच्या टायटल रिव्हिल व्हिडिओला यूट्यूबवर ४४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते आणि दोन महिन्यांपूर्वी, प्रदर्शनाची तारीख जाहीर करणाऱ्या टीझर व्हिडिओला ३० दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २५० कोटी रुपये कमावले आहेत. बॉलीवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार ‘किंग’ चित्रपटाचे थिएटरमधील वितरणाचे हक्क २५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. हा चित्रपट शाहरुख खानसाठी विशेष महत्त्वाचा आहे. यामध्ये शाहरुख त्याच्या मुलीसोबत म्हणजेच सुहानासोबत दिसणार आहे. सुहाना खानने २०२३ मध्ये झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या ओटीटी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. ‘किंग’ हा तिचा पहिला थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट असणार आहे.
पेन मरुधरने संपूर्ण हिंदुस्थानात ‘किंग’ चित्रपटाचे थिएटरमधील वितरणाचे हक्क मिळवले आहेत. चित्रपटाचे निर्माते, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत २५० कोटी रुपयांचा एक मोठा करार झाला आहे. हा या वर्षातील सर्वात मोठ्या करारांपैकी एक आहे. या वितरकाचे शाहरुख खानच्या बॅनरसोबत खूप जुने संबंध आहेत.” त्यांनी ‘जवान’, ‘डंकी’, ‘झीरो’, ‘बदला’, ‘इत्तेफाक’ आणि इतर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. ‘किंग’ २४ डिसेंबर २०२६ रोजी देशभरात भव्य प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे.



























































