
आजच्या डिजिटल युगात आपण सोशल मीडियापासून बँक खात्यांपर्यंत सर्व गोष्टींसाठी पासवर्ड (Password) वापरतो. मात्र, गेल्या काही काळापासून पासकी (Passkey) हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. गुगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्या आता पासवर्डऐवजी पासकी वापरण्याचा सल्ला देत आहेत. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणते तंत्रज्ञान सरस आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊ…
पासवर्ड म्हणजे काय?
पासवर्ड हा अक्षरे, अंक आणि चिन्हांचा एक संच असतो, जो युजर्सला लक्षात ठेवावा लागतो. एखादे अकाऊंट उघडण्यासाठी हा पासवर्ड मॅन्युअली टाईप करावा लागतो. पासवर्ड जितका लांब आणि कठीण असेल, तितका तो सुरक्षित मानला जातो. मात्र पासवर्ड चोरीला जाण्याची किंवा हॅक होण्याची भीती नेहमीच असते.
पासकी म्हणजे काय?
पासकी हे पासवर्डला दिलेला एक आधुनिक आणि अधिक सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये युजर्सला काहीही लक्षात ठेवण्याची किंवा टाईप करण्याची गरज नसते. ही पद्धत तुमच्या Device ला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनवर आधारित असते. म्हणजेच तुमचा फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा फोनचा स्क्रीन लॉक पिन वापरून तुम्ही लॉगिन करू शकता.
दोन्हींमधील मुख्य फरक:
-
लक्षात ठेवण्याचे टेन्शन: पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो, जो विसरल्यास फॉरगॉट पासवर्ड करावा लागतो. पासकीमध्ये लक्षात ठेवण्याचे कोणतेही बंधन नसते.
-
हॅकिंगचा धोका: पासवर्ड फिशिंग (Phishing) हल्ल्यांद्वारे हॅकर्स सहज चोरू शकतात. पासकी ही तुमच्या फिजिकल डिव्हाइसशी लिंक असल्याने ती चोरणे हॅकर्सना जवळजवळ अशक्य असते.
-
वापरण्यास सोपे: पासवर्ड टाईप करण्यात वेळ जातो, तर पासकीमुळे केवळ एका क्लिकवर किंवा बायोमेट्रिक स्कॅनवर जलद लॉगिन होते.
कोणते अधिक सुरक्षित आहे?
सुरक्षिततेच्या बाबतीत पासकी ही पासवर्डपेक्षा कितीतरी पटीने सरस आहे. पासवर्ड सर्व्हरवर साठवले जातात, त्यामुळे डेटा लीक झाल्यास ते धोक्यात येऊ शकतात. याउलट, पासकीमध्ये पब्लिक-प्रायव्हेट की इन्क्रिप्शन वापरले जाते. यात तुमची खाजगी माहिती कधीही सर्व्हरवर जात नाही, ती केवळ तुमच्या फोनमध्ये सुरक्षित राहते. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तंत्रज्ञान तज्ज्ञ आता पासवर्डऐवजी पासकी वापरण्याला प्राधान्य देत आहेत.



























































