
>> दिलीप ठाकूर
गुणवत्ता आहे, पण एक मोठी चांगली संधी मिळायला हवी. ती सातत्याने मिळत नसली तर आपल्या वाटेला आलेल्या लहानमोठ्या, पण विविध प्रकारच्या भूमिका करत, त्यांचा आनंद घेत घेत आपला ठसा उमटवता येतो, मोठी वाटचाल करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भरत कपूर. अतिशय चांगली उंची, भरदार आवाज, हिंदी भाषेवर प्रभुत्व, देखणं रूप ही त्याची वैशिष्ट्ये.
सत्तरच्या दशकातील पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटांत भरत कपूरने अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत आपलं अस्तित्व अधोरेखित केले. भरत कपूरचा जन्म 15 ऑक्टोबर 1945 रोजीचा पाकिस्तानातील लाहोर येथील. त्याचे वडील ईश्वरचंद हे कवी. फाळणीनंतर हे कुटुंब मुंबईत आले. भरत कपूरने डॉन बॉस्को शाळेत प्राथमिक शिक्षण आणि साबू सिद्दिकी महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केले. तेथे कादर खान प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनीच भरत कपूरला इप्टा या नाटय़ संस्थेत दाखल होण्याचा सल्ला दिला. भरत कपूरला तेथेच अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्याने रंगभूमीवर काम करणे सुरू केले. चेतन आनंद दिग्दर्शित ‘हंसते जख्म’ या चित्रपटात किरकोळ भूमिका केली. तेव्हा अमजद खान हा बरोबरीचा आणि जवळचा असा कलाकार होता. या दोघांचे ‘तनहाई’ या नाटकातील काम पाहून दिग्दर्शक चेतन आनंद यांनी या दोघांनाही चित्रपटात संधी दिली. तो चित्रपट होता ‘हिंदुस्तान की कसम’ (1973). चित्रपटात राजकुमार वगैरे बरेच कलाकार होते. त्यात भरत कपूरने पाकिस्तानी सैन्यातील पायलटची भूमिका साकारली. त्यानंतरही हे दोघे रंगभूमीवर कार्यरत होते. अशातच अशाच एका नाटकातील अमजद खानची भूमिका पाहून पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी दिग्दर्शक रमेश सिप्पींना ‘शोले’तील गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी नाव सुचवले आणि त्याने मोठी झेप घेतली. याचा भरत कपूरला आनंदच झाला आणि आपल्याला लहानमोठय़ा भूमिका साकारत वाटचाल करावी लागेल याची जाणीवही झाली. त्याच वेळी त्याला ‘क्षितिज’ या चित्रपटात झाहिरा या अभिनेत्रीचा नायक साकारायची संधी मिळाली, पण चित्रपट रखडून पडद्यावर आला. ‘गुप्त ज्ञान’ या चित्रपटात लैंगिक तज्ञ ही पूर्ण लांबीची भूमिका मिळाली, पण चित्रपट वेगळ्या विषयासाठी गाजला. या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक खूप होते. प्रेमनाथ, अजित, प्रेम चोप्रा, डॅनी डेन्झोप्पा, अमजद खान, मदन पुरी, अन्वर हुसेन, रणजीत, इम्तियाज खान, गोगा कपूर, सुधीर, मनमोहन, मॅकमोहन, नरेंद्रनाथ यांची चलती होती. (अमरीश पुरी नवप्रवाहातील चित्रपटांतून भूमिका साकारत होते.) यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर ‘मागणीनुसार काम’ हे धोरण आवश्यक आहे याची भरत कपूरला कल्पना आली. त्यातही यश चोप्रा निर्मित आणि मनमोहन पृष्ण दिग्दर्शित ‘नूरी’मधील (1979) बशीर खानच्या भूमिकेने भरत कपूरचा चित्रपटसृष्टीत जम बसला.
भरत कपूरने ‘स्वामीदादा’मध्ये लल्लू, ‘गुलामी’मध्ये ठापूर शक्ती सिंग, ‘एक डापू शहर में’ या चित्रपटात लाला मनोहरलाल, ‘इलाका’मध्ये बिरजू, ‘जिगरवाला’मध्ये भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी, ‘खुदा गवाह’मध्ये पोलीस अधिकारी अझीझ मिर्झा, ‘देस परदेस’मध्ये मुरारीलाल अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या. ‘बाजार’ चित्रपटातील अख्तर हुसेन ही खुद्द भरत कपूरची आवडती भूमिका. ‘नफरत’, ‘जानेमन’, ‘साहिब बहादूर’, ‘जंगल में मंगल’, ‘इन्कार’, ‘टूटे खिलौने’, ‘हम नौजवान’, ‘शोहरत’, ‘मीनाक्षी- टेल ऑफ थ्री सिटीज’ अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या. उपग्रह वाहिनीवर मालिकांच्या युगात भरत कपूरने ‘चंद्रकांता’, ‘कॅम्पस’, ‘आहट’, ‘चुनौती’, ‘तारा’, ‘भाग्यविधाता’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. कधी खलनायक, कधी पोलीस इन्स्पेक्टर, कधी वकील, कधी जमीनदार अशा अनेक भूमिका साकारत आपल्या कारकीर्दीचा आनंद घेतला. मुलगा राहुल कपूर मालिका दिग्दर्शक म्हणून वाटचाल करू लागला आणि त्याच्या मालिकेत काम सुरू ठेवले.
या एकूणच वाटचालीत शीव सर्पल येथील आपलं राहणं आणि अनेक वर्षे तरी रिक्षातून चित्रपट स्टुडिओत जाणं येणं कायम ठेवलं. छान गप्पा करणार, आपल्या वाटचालीवर पूर्ण समाधानी असणार हे भरत कपूर यांचे विशेष होते.





























































