
महाराष्ट्रात जो राहतो त्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली. मात्र भाषेच्या नावावर केली जाणारी हिंसा मान्य नसल्याचेही ते म्हणाले.
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीची सक्ती करण्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिवहन विभागाने आजपासून त्यासाठी विशेष मोहीमही हाती घेतली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. “प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठीचा अभिमान असणे स्वाभाविक आहे. जे लोक महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत त्यांनी मराठी शिकलीच पाहिजे,’’ असे ते म्हणाले.




























































