पनवेलच्या स्मार्ट सिटीचा फुगा फुटला, अमरधाम स्मशानभूमीत खडखडाट; मृतांवर ‘बिस्लेरी’ पाण्याने विधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे पनवेल महापालिका स्मार्ट सिटीचा डंका वाजवत असताना ही घोषणा किती बोगस आहे याचा प्रत्यय पनवेलकरांना येत आहे. शहरातील अमरधाम स्मशानभूमीत पाणीच उपलब्ध नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना ‘बिस्लेरी’चे (पॅकेज ड्रिंकिंग वॉटर) पाणी विकत आणून अंत्यविधी करावे लागत आहेत. कोटीच्या कोटी बजेट मांडणाऱ्या महापालिका आयुक्तांना ही घटना पाहून जाग येईल का? असा सवाल मृतांचे नातेवाईक करीत आहेत.

पनवेलच्या अमरधाम स्मशानभूमीत एकाच वेळी दोन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र स्मशानभूमीचे नळ कोरडे होते. अंत्यविधीसाठी लवकरात लवकर पाणी आणा असे पुरोहितांनी सांगितले. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली. त्यांनी तत्काळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून टँकर मागवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले. अंत्यसंस्काराची वेळ टळत आल्याने आणि पाणी मिळण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने अखेर नातेवाईकांनी बिस्लेरी पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे कॅन आणले आणि त्या पाण्याने हा विधी पूर्ण केला.

जिवंतपणी नाही, निदान मेल्यावर तरी पाणी द्या…

पनवेलमध्ये अनेक भागात पाण्याचा मोठा तुटवडा आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या अनेक गावांची तर पाण्यासाठी प्रचंड वणवण सुरू आहे. जिवंतपणी महापालिका पाणी देत नाही. निदान मेल्यावर तरी पाणी द्या, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. जे प्रशासन पाणी देत नाही त्यांचा काय फायदा? स्मार्ट सिटीचे ढोल कसले बडवता, असा संताप सामाजिक कार्यकर्ते दिलीप कदम यांनी केला.