जाऊ शब्दांच्या गावा – उभ्या बाजारात कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  साधना गोरे 

‘मराठी भाषा वळवावी तशी वळते’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. खरंतर प्रत्येक जिवंत भाषा ही वळवावी तशी वळते, फक्त आपल्याला ती भाषा चांगली अवगत असायला हवी. मराठीत अनेक क्रियापदं किंवा विशेषणं अशी आहेत की जी अमराठी भाषकांना गोंधळात टाकू शकतात. उदाहरण म्हणून ‘टाकणे’ क्रियापद घेऊया. चेंडू टाकणे, हात टाकणे, कचरा टाकणे, बिछाना टाकणे, नवऱ्याने त्याच्या बायकोला टाकणे, एखाद्याचे नाव टाकणे, विश्वास टाकणे, विहिरीत उडी टाकणे, एखाद्या क्षेत्रात उडी टाकणे, मारून टाकणे, पाडून टाकणे, खाऊन – देऊन – पिऊन – लिहून टाकणे, टाकून बोलणे इ. मराठीतलं असंच एक विविधार्थी विशेषण म्हणजे ‘उभा’ – ‘उभे’.

‘उभा’ हा शब्द सरळ, खडा, ताठ या अर्थाने थेट वापरला जातो. पण संदर्भानुसार आपण हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरत असतो. उदा. आडवी पडलेली वस्तू उभी करणे, माझं घराचं बांधकाम उभं आहे, पावसाने शेतातलं उभं पीक झोडपून काढलं, त्याचं दुकान घेण्यास कुणी उभा राहत नाही, त्या दोघांमध्ये उभा दावा आहे, उभ्या वर्षात धंद्यात काही फायदा झाला नाही, उभ्या पावसात भातलावणीचे काम चालू होते, पोलिसांनी खोटा खटला उभा केला, डोळ्यांत अश्रू उभे राहिले, घरात लग्न उभं राहिल्यामुळे तुम्हाला मदत करायला माझ्याकडे पैसे नाहीत, या घराच्या विक्रीतून किती पैसे उभे राहतील, नवा धंदा उभा केला आहे, अशी कितीतरी वाक्यं आपण नेहमी म्हणत असतो.

या ‘उभा’ शब्दाच्या मुळाविषयी व्युत्पत्तिकोशकार पृ.पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘हेमचंद्र आणि प्राकृत व्याकरणकारही ऊर्ध्वम् (संस्कृत), उब्भ / उढ्ढ (प्राकृत), उभुं (गुजराती), उबु (बंगाली), उभो (सिंधी), उडू (सिंहली) अशी व्युत्पत्ती सांगतात. परंतु ही व्युत्पत्ती वर्णप्रक्रियेच्या नियमांशी विसंगत दिसते. त्याच्या मुळाशी संस्कृतमधील ‘उद्धाहु’, अवेस्तामधील `Uzbazus’, प्राकृतमधील ‘उब्भाअ’ असा शब्द असावा. यापासून उभवण, उभवणी, उभवणे, उभारणीस उभारा, उभाड, उभार, उभारी इ. शब्द तयार होतात.’’

बसण्याइतकीसुद्धा फुरसत नसताना एखाद्याला घाईघाईने, लगबगीने भेटणं या अर्थाने ‘उभ्याउभ्या भेट घेतली’ किंवा ‘उभाउभी येणे’ म्हटलं जातं. मदत, साहाय्य करणे या अर्थाने ‘तो माझ्या मागे उभा राहिला’ असं म्हटलं जातं. हाडवैर, न मिटणारे भांडण या अर्थाने ‘उभा दावा’ किंवा ‘उभं वैर’ असे शब्दप्रयोग वापरले जातात. उदा. जावा जावा अन् उभा दावा.

सर्व आयुष्यात, सर्व हयातीत या अर्थाने ‘उभ्या जन्मात’ म्हटलं जातं. झाड उभं असतानाच वाळणं किंवा मनुष्य काळजीने कृश होणं या अर्थाने ‘उभे वाळणे’ म्हणतात. अस्वस्थ वाटणं, मन अस्थिर होणं या अर्थाने ‘उभं वारं सुटणं’ म्हणतात. समूळ नाहीसं करणं किंवा सर्व गिळंकृतकरणं या अर्थाने ‘उभे खाणे’ म्हणतात.

सध्या उन्हाने इतकी काहिली होत आहे की घराबाहेर पडलं की घामाचीच अंघोळ होते. अशा वेळी ‘घामाने उभा नाहलो / नाहले’ असं आपण म्हणतो. खडा पहारा म्हणजे न बसता सारखं उभं राहून सतत ठेवलेल्या पाहऱ्याला ‘उभा पहारा’ म्हणतात. पाऊस कसा पडतो यावरून त्याला विशेषणं लावली जातात. उदा. पावसाच्या धारा लंब रेषेत पडत असतील तर त्याला ‘उभा पाऊस’ म्हटलं जातं. याउलट आडव्या धारा येत असतील तर ‘वाकडा पाऊस’ आणि एकसारख्या सतत पडणाऱ्या पावसाला ‘भर पाऊस’ म्हणतात. उंटाला उभा करून त्याला शिडी लावून चढण्याची यातायात करण्यापेक्षा त्याला खाली बसवून त्यावर बसणे हा सरळ नि सोपा मार्ग आहे. पण काही लोक विनाकारण एखादी गोष्ट कठीण करून द्राविडी प्राणायाम घालतात. अशा लोकांना उद्देशून ‘उभ्या उंटावर शिडी लावून चढणे’ असा शब्दप्रयोग केला जातो.

बाजारपेठांमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत बाजार भरलेला असतो तेव्हा त्याला ‘उभा बाजार’ म्हणतात. मजेशीर गोष्ट म्हणजे, चारचौघांत, जाहीरपणे, सर्वांदेखत एखादी गोष्ट करणे किंवा बोलणे याला ‘उभ्या बाजारात’ म्हटलं जातं. संत तुकारामांचा एक अभंग आहे – उभ्या बाजारात कथा। हें तों नावडे पंढरीनाथा? अवघे पोटासाठी सोंग। तेथें पैंचा पांडुरंग? याचा अर्थ, भर बाजारात कथा करणं हे पंढरीनाथाला आवडत नाही. जे कोणी कथेचा बाजार मांडतात, ते सर्व त्यांचे पोट भरण्याचे उद्योग आहेत. तिथं पांडुरंगाविषयीची श्रद्धा नसून पोटासाठी अवघं नाटक आहे.

[email protected]