
आरटीओतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश अल्पकाळासाठी जारी करून नंतर संबंधितांना पदावनत केले. त्यावरून राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. त्याच नाराजीतून आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. येत्या 2 जूनला दोन तास उग्र निदर्शने, नंतर 9 जूनला लाक्षणिक संप आणि 16 जूनपासून बेमुदत संप अशाप्रकारे तीन टप्प्यांत आंदोलन केले जाणार आहे.
मोटार वाहन विभागाचा आकृतीबंध 23 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांपूर्वी सरकारने मान्य केला. कर्मचाऱ्यांना पूर्वी पदोन्नतीच्या अत्यंत नगण्य संधी असल्याने नवीन आकृतीबंधाद्वारे कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ पदांमध्ये पुरेशी वाढ झाली. परंतु गेल्या तीन-साडेतीन वर्षांत पदांचे सेवा प्रवेश नियम अस्तित्वात नाहीत. परिणामी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून दीर्घकाळ वंचित राहावे लागत असल्याने कर्मचारी आंदोलन करणार आहेत.

























































