
>> भावेश ब्राह्मणकर
[email protected]
जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ग्रीन ऑस्कर’ने सन्मानित डॉ. बरखा सुब्बा आणि परवीन शेख या भारतीय महिलांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
निसर्ग संवर्धनाची व्याख्या जेव्हा जेव्हा केली जाते, तेव्हा मोठय़ा आणि लोकप्रिय प्राण्यांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात. वाघ, सिंह, हत्ती किंवा गेंडा वाचवण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प राबवले जातात, पण याच निसर्ग साखळीचा मुख्य कणा असलेले छोटे उभयचर आणि दुर्मिळ पक्षी अनेकदा सरकारी धोरणांपासून ते जनमानसाच्या नजरेतून सुटून जातात. याच दुर्लक्षित आणि संकटग्रस्त प्रजातींचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी दोन भारतीय महिला शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. वन्य जीव संशोधक डॉ. बरखा सुब्बा आणि परवीन शेख, ज्यांनी आपल्या अभूतपूर्व संवर्धन कार्यामुळे नुकताच जागतिक पातळीवरील पर्यावरण क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा ‘व्हिटले पुरस्कार 2026’ पटकावला आहे. लंडनच्या ‘रॉयल जिओग्राफिकल सोसायटी’मध्ये जेव्हा युनायटेड किंगडमच्या प्रिन्सेस अॅन यांच्या हस्ते या दोघींना सन्मानित करण्यात आले, तेव्हा तो केवळ या दोन संशोधकांचा गौरव नव्हता, तर भारताच्या कानाकोपऱयात स्थानिक समुदायांना सोबत घेऊन लढल्या जाणाऱया मूक पर्यावरण चळवळीचा तो सर्वात मोठा जागतिक सन्मान होता.
दार्जिलिंगच्या जंगलात कार्यरत
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा उल्लेख होताच डोळ्यांसमोर येतात ते चहाचे अथांग मळे, धुक्याची चादर आणि कांचनजंगाचे बर्फाच्छादित शिखर, पण याच निसर्गरम्य परिसराच्या कुशीत एक आदिम जीव आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे, ज्याचे नाव आहे ‘हिमालयीन सॅलामँडर’. एका सरडय़ासारखा दिसणारा हा उभयचर प्राणी कोटय़वधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. दार्जिलिंगच्या घनदाट जंगलात वाढलेल्या डॉ. बरखा सुब्बा यांना लहानपणापासूनच या गूढ विश्वाचे आकर्षण होते.
पाणथळ जागांचा ‘आरोग्य दूत’
हिमालयीन सॅलामँडर हा केवळ एक प्राणी नाही, तर तो ज्या पाणथळ जागेत राहतो, तिथल्या पर्यावरणाच्या शुद्धतेचा तो जिवंत पुरावा आहे. या प्राण्याकडे आपले गमावलेले अवयव पुन्हा नैसर्गिकरीत्या तयार करण्याची अद्भुत क्षमता आहे, पण मानवी हस्तक्षेपामुळे हा जीव आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दार्जिलिंगमध्ये अनियंत्रित पर्यटन, चहाच्या बागांचे वाढते व्यापारीकरण आणि रस्ते बांधणीमुळे येथील लहान लहान तलाव आणि पाणथळ जागा नष्ट होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण दार्जिलिंगमध्ये आता सॅलामँडरची केवळ 30 प्रजनन स्थळे शिल्लक उरली आहेत आणि त्यातील बहुतांश जागा सरकारी संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर म्हणजेच मानवी वस्तीजवळ आहेत.
डॉ. बरखा सुब्बा यांनी ‘फेडरेशन ऑफ सोसायटीज फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन’ या संस्थेच्या माध्यमातून या संकटावर वैज्ञानिक तोडगा शोधला. ‘व्हिटले पुरस्कारा’च्या माध्यमातून मिळणाऱया निधीचा वापर करून त्या आता सर्वात संवेदनशील अशा सात प्रजनन स्थळांचे पुनरुज्जीवन करणार आहेत. यामध्ये तलावांमधील आक्रमक वनस्पती काढून टाकणे, स्थानिक वनस्पतींची लागवड करणे आणि उभयचरांसाठी अत्यंत घातक मानल्या जाणाऱया ‘कायट्रिड बुरशीजन्य’ आजाराचे क्रीनिंग करणे समाविष्ट आहे, पण बरखा यांचे खरे यश हे आहे की, त्यांनी चहाच्या बागांचे व्यवस्थापक, स्थानिक तरुण आणि महिलांना या मोहिमेत सामील करून घेतले आहे. त्यांना पर्यावरणपूरक पर्यटनाचे प्रशिक्षण देऊन ही स्थानिक रोजगाराची संधी बनवली आहे.
चंबळच्या खोऱयातील रक्षक
दार्जिलिंगच्या थंड हवेपासून हजारो किलोमीटर दूर, मध्य भारताच्या कडक उन्हात आणि चंबळ नदीच्या अथांग पात्रात दुसरी एक कहाणी आकाराला येत होती. विख्यात ‘बॉम्बे नॅशनल हिस्टरी सोसायटी’च्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ परवीन शेख यांनी आपले संपूर्ण आयुष्य ‘इंडियन स्किमर’ या अत्यंत देखण्या आणि संकटग्रस्त नदीय पक्ष्यासाठी वाहून घेतले आहे. वरचा भाग काळा, खालचा भाग पांढरा आणि कात्रीसारखी लांब नारंगी-लाल चोच असलेला हा पक्षी पाण्यावर अत्यंत वेगाने तरंगत मासे पकडतो. एकेकाळी संपूर्ण आग्नेय आशियात मुक्तपणे विहरण करणाऱया या पक्ष्याची जागतिक लोकसंख्या आता कमालीची घटली असून त्यातील 90 टक्के पक्षी केवळ भारत आणि बांगलादेशात उरले आहेत. चंबळ नदी हे त्यांचे सर्वात मोठे आश्रयस्थान आहे.
वाळू उपसा आणि ‘घरटय़ांचे रक्षक’
इंडियन स्किमर हा पक्षी नदीच्या पात्रात तात्पुरत्या तयार होणाऱया वाळूच्या बेटांवर आपली घरटी बांधतो आणि अंडी घालतो. मात्र, गेल्या काही वर्षांत चंबळच्या खोऱयात झालेला बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा, धरणांमुळे बदलणारा पाण्याचा प्रवाह, पाण्याचे प्रदूषण आणि नदीकाठच्या मानवी हस्तक्षेपामुळे या पक्ष्यांचा वंश धोक्यात आला. नदीकाठची भटकी कुत्री आणि गुरेढोरे या पक्ष्यांची घरटी आणि अंडी उद्ध्वस्त करत असत. परवीन शेख यांनी यावर केवळ प्रयोगशाळेत संशोधन न करता थेट जमिनीवर उतरून काम सुरू केले. त्यांनी चंबळ नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन लोकांचे प्रबोधन केले आणि ‘घरटय़ांचे रक्षक’ ही अनोखी मोहीम सुरू केली. नदीकाठच्या तीसहून अधिक स्थानिक तरुणांना त्यांनी या कामासाठी मानधनावर नियुक्त केले. हे रक्षक उन्हातान्हात नदीच्या बेटांवर गस्त घालून पक्ष्यांच्या अंडय़ांचे कुत्रे आणि चोरांपासून रक्षण करतात.
परवीन शेख यांच्या या कम्युनिटी मॉडेलचे परिणाम थक्क करणारे आहेत. चंबळच्या खोऱयात इंडियन स्किमरच्या घरटय़ांचा जगण्याचा दर 14 टक्क्यांवरून थेट 27 झाला आहे. 2017 मध्ये जिथे केवळ 400 पक्षी मोजले गेले होते, तिथे 2025-26 पर्यंत ही संख्या एक हजारच्या पार गेली आहे. आता ‘व्हिटले पुरस्कारा’च्या मदतीने परवीन आपली ही मोहीम उत्तर प्रदेशातील प्रयागराज (गंगा-यमुना संगम परिसर) येथे विस्तारित करत आहेत.
डॉ. बरखा सुब्बा आणि परवीन शेख यांचे हे यश केवळ दोन वैयक्तिक पुरस्कारांपुरते मर्यादित नाही. या यशाने जागतिक पर्यावरण क्षेत्राला एक नवीन दिशा दिली आहे. स्थानिक चहाच्या मळ्यातील कामगार असो की चंबळच्या खोऱयातील मच्छीमार, जोपर्यंत स्थानिक माणसाला त्या प्राण्याबद्दल आपुलकी वाटत नाही आणि त्याच्या संरक्षणातून स्वतच्या उपजीविकेचा मार्ग दिसत नाही, तोपर्यंत कोणतीही संवर्धन मोहीम यशस्वी होऊ शकत नाही हे या दोघींनी दाखवून दिले आहे.
निसर्गाचा समतोल हा केवळ वाघ-सिंहांच्या असण्यावर अवलंबून नसतो, तर तो पाण्याच्या शुद्धतेची साक्ष देणाऱया लहानशा सॅलामँडरवर आणि नदीच्या संथ प्रवाहावर उडणाऱया इंडियन स्किमरवरही तितकाच अवलंबून असतो हे भान यानिमित्ताने संपूर्ण देशाला आले आहे. डॉ. बरखा सुब्बा आणि परवीन शेख यांनी भारताच्या या दोन ‘ग्रीन ऑस्कर’ विजेत्या महिला शास्त्रज्ञांचा प्रवास हा देशातील आगामी पिढीसाठी, विशेषत विज्ञान क्षेत्रात येणाऱया तरुणींसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)




























































