मनतरंग – जीवनसाथी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर
[email protected]

नवरा-बायकोच्या नात्यामध्ये भावनिक चचे प्रसंग हे नेहमीचेच; पण ते हाताळण्याची जबाबदारी ही दोघांचीच असली पाहिजे. त्यात जर विनाकारण तिसऱया व्यक्तीला/व्यक्तींना वारंवार न्यायाधीश बनवून जोडीराला अपराधी ठरवलं जात असेल तर तो त्याचा अपमान आहेच, पण ही गोष्ट वैवाहिक जीवन क्लेशकारक बनवते.

प्रतीक आणि प्रिया (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा प्रेमविवाह होता. एक वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. लग्नाबद्दल विचारणा होताना “मला माझी काळजी घेणारी, एकत्र कुटुंबात राहू शकणारी समजूतदार बायको मला हवी आहे आणि तू मला तशीच वाटलीस, क्लिक झालीस,’’ या उत्तराने साहजिकच तिचं मन जिंकलं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्या दोघांचं लग्न झालं आणि प्रिया एकत्र कुटुंबात आनंदाने राहायला आली.

‘असं काय झालं की प्रिया घर सोडून गेली?’ समुपदेशनाला आलेल्या प्रतीकला सुरुवात कुठून करावी हे समजत नव्हतं. म्हणून त्याच्याबरोबर त्याचा मित्र आलेला होता. “मॅम, प्रतीकच्या म्हणण्याप्रमाणे काल दोघांचं क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि आज सकाळी ती घर सोडून गेली. विशेष म्हणजे ही दोघंही सकाळी बोलत होती. जेव्हा हा ऑफिसला गेला तेव्हा ती सोडून गेली.’’ मित्राने एवढं बोलून प्रतीककडे पाहिलं.

“मी सांगतो काय घडलं ते,’’ असं म्हणून प्रतीकने बोलायला सुरुवात केली. ती दोघंही गेले सहा महिने वेगळ्या घरी राहत होती. कारण प्रियाचं आणि तिच्या सासूबाईंचं एकमेकींशी पटत नव्हतं. दोघंही वेगळे राहिल्यावरही ती दोघं भांडतच रहायची. अशाच एका दिवशी प्रतीक कामावरून घरी आला होता. प्रिया लॅपटॉपवर तिचं काम करत होती. रात्री जेवल्यावरसुद्धा तिचं काम बाकी होतं म्हणून तो एकटाच झोपायला गेला आणि प्रिया हॉलमध्ये काम करत राहिली. सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याने बघितलं तर प्रिया हॉलमध्येच गाढ झोपलेली होती. त्याने तिला उठवत ‘मला उशीर होतोय. मला नाश्ता बनवून देतेस का?’ असं विचारलं. त्याच्या या प्रश्नावर तिने ‘बाहेरून आण आणि खा’ असं उत्तर दिलं. प्रतीकला यावर काय बोलावं हे कळलं नाही. शेवटी तो ऑफिसला निघून गेला. संध्याकाळीसुद्धा प्रिया बोलतच नव्हती. प्रियाचा थंड प्रतिसाद पाहून तो खवळला. त्याने रागारागाने मित्राला फोन केला आणि प्रियाबद्दल तक्रारी सुरू केल्या.

रागाच्या भरात त्याने तिच्या माहेरच्यांचा उद्धार केलाच पण तिच्याबद्दलही मित्रासमोर अपशब्द वापरले. या प्रसंगानंतर प्रिया दुसऱया दिवशी घर सोडून माहेरी गेली. पण जाताना तिने प्रतीकला सांगितलं की, ज्या दिवशी तो खऱया अर्थाने तिला त्याची जीवनसाथी म्हणून वागवेल तेव्हाच त्याने तिला घ्यायला यावं.

“तिच्या बोलण्याला काय अर्थ आहे मॅम? मी तिला सगळं काही पाहिजे ते घेऊन दिलंय. तिला सेपरेट घर हवं होतं तेही केलं. तरीही ती अशी का वागली?’’ प्रतीक अस्वस्थ होऊन म्हणाला.

प्रिया ही स्वाभिमानी, गंभीर, स्वप्नाळू आणि समंजस मुलगी होती. मध्यमवर्गीय असल्यामुळे तिच्या गरजा भौतिक कमी आणि भावनिक जास्त होत्या. याउलट प्रतीक हा काहीसा व्यवहारिक, गर्विष्ठ, रागीट होता. पण सगळ्यात मोठा दोष त्याच्यात होता तो म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाहीत तर तो आकाशपाताळ एक करी. प्रियाने अशा प्रतीकला सांभाळलं होतं. पण जेव्हा दोघांच्या छोटय़ामोठय़ा कुरबुरी होत तेव्हा तो त्याच्या आई आणि बहिणीला जाऊन सांगे. तसंच प्रियाचं जरा कुठे चुकलं तर तिच्याही वहिनीला फोन करून तक्रारी करत असे. त्याच्या अशा वागण्याला प्रिया वैतागली. तिने त्याला नवरा-बायकोमध्ये तिसरं येऊ नये हे परोपरी सांगून पाहिलं, पण त्याच्यात काही फरक नव्हता.

ती दोघं नंतर स्वतंत्र जरी राहिली तरी प्रतीकचं वागणं सुधारलं नाही. तो त्यांच्यातल्या छोटय़ामोठय़ा कुरबुरी जगजाहीर करतच राहिला. त्यामुळे प्रिया नाराज राहू लागली. दोघांमधला संवाद कमीच व्हायला लागला. आणि त्या दिवशी प्रियाने नाइलाजाने हे पाऊल उचललं. “तुला माहिती आहे का की प्रिया आदल्या दिवशी कुठल्या स्ट्रेसमध्ये होती ते?’’ मित्राने त्याला विचारल्यावर त्याने चमकून मित्राकडे पाहिलं. “म्हणजे प्रियाने तुलाही सांगितलं?’’ “हो. आणि तिच्याच म्हणण्यानुसार तुला मी वैवाहिक समुपदेशनासाठी घेऊन आलोय,’’ मित्राच्या तोंडून स्वतची खरी ओळख पटल्यानंतर प्रतीकला अधिकच अपराधी वाटायला लागलं. वास्तविक प्रियाने हे पाऊल उचलण्यामागे तिचा दाबून ठेवलेला राग हे कारण होतं. त्याच्या मित्राच्या म्हणण्यानुसार प्रतीक नंतर नंतर तिच्याबाबतीत खूपच कठोर होत गेला.

नवराबायकोच्या नात्यामध्ये भावनिक चढउताराचे प्रसंग हे नेहमीचेच. पण ते हाताळण्याची जबाबदारी ही दोघांचीच असली पाहिजे. त्यात जर विनाकारण तिसऱया व्यक्तीला/व्यक्तींना वारंवार न्यायाधीश बनवून जोडीराला अपराधी ठरवलं जात असेल तर तो त्याचा अपमान आहेच, पण ही गोष्ट वैवाहिक जीवन क्लेशकारक बनवते. आजकाल हे बघितलं गेलंय की, तरुण जोडपी वैवाहिक जीवनाची सुरुवात करत असतात तेव्हा दोघांचाही हा एकत्र राहण्याचा पहिलाच अनुभव असतो. दोघंही परफेक्ट नसतात. त्यातून मग वादाचे प्रसंग, आवड-नावड या साऱया गोष्टींना जोडप्याला सामोरे जावेच लागते. त्यात गरज असते ती एकमेकांना स्वीकारण्याची आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या कटू गोष्टी खाजगी ठेवण्याची. तिसरी व्यक्ती जर विनाकारण न्यायाधीश बनवली जात असेल तर त्याही व्यक्तीने भान राखून परिस्थिती सांभाळली पाहिजे. कारण त्या व्यक्तीवर नैतिक जबाबदारी असते.

दुर्दैवाने ही जबाबदारी पेलता न आल्याने आधीच विभक्त झालेली कुटुंबं अजूनच एकमेकांपासून दुरावत चालली आहेत, एकमेकांपासून अंतर ठेवत आहेत आणि गरजेपेक्षा नात्यात व्यवहार आणत आहेत. प्रतीकला आज या गोष्टी कळू लागल्या आहेत. त्याने त्यावर काम करायलाही सुरुवात केली आहे. त्याला प्रियाला पुन्हा मिळवायचं आहे. तिचा जीवनसाथी व्हायचं आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)