
स्वरयंत्राशी संबंधित (लॅरिन्गोलॉजी) संशोधन प्रबंधाबद्दल डॉ. जिजा खांडेकर मरखेडकर यांना जागतिक पातळीवरील सॅटलॉफ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. भारतीय युवा संशोधकाला हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्वरयंत्राशी संबंधित विज्ञानामध्ये अमेरिकेतील डॉ. रॉबर्ट सॅटलॉफ यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार त्यांच्याच हस्ते डॉ. जिजा यांना अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी या क्षेत्राशी संबंधित जगभरातील शल्यविशारद उपस्थित होते.
‘लिसनिंग टू द व्हाईसेस बिहाईंड द व्हॉईसः डेव्हलपिंग अ प्रोफेशन स्पेसिफिक प्रॉम फॉर व्होकली इंटेन्सिव्ह प्रोफेशनल्स’ हा डॉ. जिजा यांचा संशोधनाचा विषय होता. याशिवाय, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या आणि गायकीच्या अनुषंगानेही त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यासंदर्भातील ‘व्हीडिओ स्ट्रोबोस्कोपिक कॅरेक्टरायझेशन ऑफ व्होकल फोल्ड ब्हायब्रेटरी पॅटर्न्स इन हिंदुस्तानी क्लासिकल सिंगर्स’ या प्रबंधाबद्दल त्यांना ‘न्यू इन्व्हेस्टिगेटर्स फोरम’ पुरस्कार आणि अभ्यासवृत्ती देण्यात आली आहे. डॉ. जिजा खांडेकर मरखेडकर एमएस (ईएनटी), डीएनबी असून लॅरिन्गोलोजी या विषयात त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये फेलोशिप केली आहे.

























































