
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सहा खासदार गायब झाले आहेत. यातीलच एक खासदार संजय जाधव आहेत. खासदार संजय जाधव गायब झाल्यानंतर शिवसैनिक संतापले आहेत. यातच आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे.
संतप्त शिवसैनिकांनी गद्दार संजय जाधव, अशा घोषणा देत संजय जाधव यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली. यावेळी मोठ्या संख्येने निष्ठावान शिवसैनिक एकवटले होते. संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. दरम्यान, अद्यापही संजय जाधव हे गायब आहेत. यामुळे स्थानिक शिवसैनिक आणि जनतेमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे.


























































