वेदांत बंडगर हत्या प्रकरण – जतच्या उपअधीक्षकांसह पाचजणांना ‘कारणे दाखवा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जतमधील गोळीबार आणि वेदान्त बंडगर खून प्रकरणात आता उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह चार निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संबंधितांना नोटीस पाठवून तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

जतचे तत्कालीन निरीक्षक संदीप कोळेकर, संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे आणि विशेष शाखेचे तत्कालीन निरीक्षक संजय मोरे यांना नोटीस बजावण्यात
आली आहे.

जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात गुन्हेगार नीलेश गडदे याने लक्ष्मण खरात यांच्या बाज येथील घरात घुसून धमकी देत खंडणी मागितली. त्यानंतर दुसऱया दिवशी जत पोलीस ठाण्याच्या दारात तो आला होता. त्यानंतर त्याने सांगलीत येऊन वेदान्त बंडगर या 14 वर्षीय बालकाची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली. जत पोलिसांनी वेळीच कारवाईचा बडगा उगारला असता, तर बालकाची हत्या टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया समाजात उमटली. या प्रकरणानंतर जतचे उपअधीक्षक सचिन थोरबोले यांची भूमिकाही स्पष्ट झाली नाही. पोलीस ठाण्याच्या शेजारीच असणाऱया कार्यालयात त्यांचा कारभार चालतो. तरीही त्यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

तसेच तत्कालीन निरीक्षक कोळेकर यांनी वेळीच कारवाई केली असती, तर पुढील अनर्थ टळला असता, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे. यासह संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम, जिल्हा विशेष शाखेचे तत्कालीन निरीक्षक संजय मोरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे उत्तर दिल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक शर्मा कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.