
पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्काअंतर्गत दाखल गंभीर गुह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत खर्डा येथील रोहित ऊर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (वय 27) आणि मुळशी तालुक्यातील ज्ञानेश्वर ऊर्फ माउली दगडू तोंडे (वय 40) यांना पकडण्यात आले.
खर्डा (ता. जामखेड) येथील विजयसिंह कल्याणराव गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 मे 2026 रोजी रोहित उर्फ बबलू गोलेकर याने व्हॉट्सऍप कॉलद्वारे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.
या गुह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रोहित गोलेकर याला कोल्हापूर जिह्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यड्राव फाटा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खंडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान रोहित गोलेकर हा पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत गंभीर गुह्यांमध्येही फरार असल्याचे उघड झाले. त्याच्यावर एकूण सात गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोथरूड पोलीस ठाण्यातील गुह्यांमध्ये फरार असलेला ज्ञानेश्वर उर्फ माउली दगडू तोंडे हा मिरजगाव शिवारातील सोलापूर-अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. तोंडे याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुह्यांसह एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी हे पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित असून, संघटित गुन्हेगारी, खंडणी, शस्त्र्ाास्त्र्ा बाळगणे आणि धमकी देण्यासारख्या गंभीर गुह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.
रोहित उर्फ बबलू गोलेकर याला पुढील तपासासाठी खर्डा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तर ज्ञानेश्वर उर्फ माउली तोंडे याला पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राहुल द्वारके, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, राहुल डोके, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सतीश भवर आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
























































