प्रदर्शनाआधीच ‘ईठा’ वादाच्या भोवऱ्यात; विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबीयांचा नाव बदलण्याचा आग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. ईठाचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा टीझर चांगलाच गाजला. श्रद्धाने साकारलेली ‘इठा’ची भूमिका अंगावर काटा आणणारी होती. मात्र, आता हा चित्रपट अडचणींचा सामना करत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा बहुचर्चित ‘ईठा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या शीर्षकावर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली आहे.

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर विठाबाईंचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, चित्रपटाची माहिती त्यांना अवघ्या आठवडाभरापूर्वी मिळाली. आईचा संघर्ष मोठ्या पडद्यावर येत असल्याचा अभिमान असला, तरी निर्मात्यांनी आधी कुटुंबीयांशी संवाद साधायला हवा होता. त्यामुळे विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे पैलू चित्रपटात अधिक प्रभावीपणे मांडता आले असते, असे त्यांनी म्हटले. असे वृत्त आज तक ने दिले आहे. यासंदर्भात त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागात ‘विठा’चा उच्चार ‘ईठा’ असा केला जातो, हे खरे असले तरी त्यांचे अधिकृत नाव विठाबाई आहे. त्यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांचा इतिहास योग्य नावाने पोहोचावा, यासाठी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवावा, अशीही त्यांची इच्छा आहे.

दरम्यान, विठाबाईंच्या नातवानेही निर्मात्यांना ई-मेलद्वारे सूचना पाठवल्याचे सांगितले. ‘ईठा’ ऐवजी ‘विठा’ असे शीर्षक ठेवावे आणि त्यासोबत ‘नारायणगावकर’ हे पूर्ण नाव उपशीर्षकात द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. चित्रपट निर्मितीला विरोध नसून, केवळ नाव आणि ऐतिहासिक ओळख योग्य प्रकारे जपली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबीयांनी इशाराही दिला आहे की, 2 ते 3 जुलैपर्यंत निर्मात्यांनी संपर्क साधला नाही किंवा चित्रपटात आक्षेपार्ह बाबी आढळल्यास कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल. यासाठी उच्च न्यायालयातील वकिलांशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, या संपूर्ण वादावर अद्याप दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर किंवा निर्माते दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ईठा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, टीझरला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.