Nanded News – नांदेड बस स्थानकावर चहा-कॉफी सेंटरला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड येथील मुख्य एसटी बस स्थानक परिसरातील एका दुकानाला आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने आजूबाजूची दुकाने आणि बस स्थानकाचा परिसर मोठ्या दुर्घटनेतून वाचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड बस स्थानकातील ‘मॅजिक चहा कॉफी सेंटर’ या दुकानाला आज अचानक आग लागली. मोहम्मद कोतवाल यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे अधिकारी आणि जवान एका अग्निशामक वाहनासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

मॅजिक चहा कॉफी सेंटरचे मालक संजय बहादूर सिंग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. या आगीत दुकानातील सिलिंग, फ्रिज, थर्मास, स्टीलची भांडी आणि गॅस सिलेंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत दुकानदाराचे अंदाजे ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. जवानांच्या सतर्कतेमुळे शेजारील दुकाने बचावली ज्यावेळी चहाच्या दुकानाने पेट घेतला, तेव्हा आग आजूबाजूला पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दुकानाच्या उजव्या बाजूला असलेले ‘साई पूजा ऑप्टिकल’ हे दुकान वाचले. डाव्या बाजूला असलेले ‘नवनाथ रसवंती’ हे दुकानही आगीपासून सुरक्षित वाचवण्यात  यश आले. भरबसलेल्या बस स्थानक परिसरात ही आग लागल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.