Ketan Agarwal Case सिया, चेतनच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केतन अगरवाल याच्या हत्येप्रकरणी आज आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ५ दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी दि.२९ कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपींना पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.

तपासातील काही शिल्लक बाबींच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यामुळे दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुणे- पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन आणि मार्केटयार्डातील मसाले विक्रीचे व्यापारी प्रवीण गोयल यांची मुलगी सिया यांचा साखरपुडा झाला होता. सियाला केतनसोबत लग्न करणे मान्य नसल्यामुळे तिने आरोपी बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या मदतीने लोहगडावरून ढकलून देत १८ जूनला केतनचा खून केला. या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

न्यायालयात काय घडले?

सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “या गुन्ह्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली असून, अनेक महत्त्वाचे पुरावे हस्तगत करायचे आहेत. तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे.” न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.