पडद्याआडून – ‘थोडं नॉटी, थोडं थॉटी’ -‘श्रमेश बेटकर कॉमेडी शो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> पराग खोत
आनंददायी हास्यानुभव मराठी रंगभूमीवर स्टँड-अप कॉमेडी हा प्रकार अजूनही स्वत-ची एक विशिष्ट ओळख निर्माण करण्याच्या टप्प्यात आहे. हिंदी आणि इंग्रजी स्टँड-अपच्या प्रभावामुळे या प्रकाराकडे तरुणाई मोठय़ा प्रमाणावर आकर्षित झाली असली, तरी मराठीत दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहता येईल असा स्टँड-अप क्वचितच पाहायला मिळतो. आपला नक्की प्रेक्षकवर्ग कोण याची ठाम खात्री नसल्याने प्रेक्षकप्रियतेच्या नादात गाडी रुळावरुन घसरते आणि सवंगतेच्या मार्गाला लागते. तरुणाईला हा सवंगपणा आवडतो असा गैरसमज करुन घेणाऱया अनेक स्टँडअप्
कॉमेडियन्सनी त्यांचे नशीब अजमावून पाहिलेय. मात्र मराठी प्रेक्षकांनी नीरक्षीरविवेक दाखवून योग्य तेच निवडलेय आणि दर्जेदारपणाला प्रोत्साहन दिलेय. अशा वेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या अचूक कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा श्रमेश बेटकर ‘थोडं नॉटी, थोडं थॉटी’ या पहिल्याच स्वतंत्र स्टँड-अप शोद्वारे एक वेगळी वाट चोखाळतो आणि त्यात तो बऱयाच अंशी यशस्वीही ठरतो.
स्किट्स, नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांना हसवणाऱया श्रमेशने यावेळी कोणत्याही पात्राचा आधार न घेता स्वत-च्या व्यक्तिमत्त्वासह रंगमंचावर उभे राहण्याचे धाडस दाखवले आहे. एखाद्या कलाकारासाठी हा प्रवास सोपा नसतो. पात्रामागे लपता येते; पण स्टँड-अपमध्ये कलाकारालाच स्वत-च्या निरीक्षणांवर, अनुभवांवर आणि संवादकाwशल्यावर प्रेक्षकांचा विश्वास जिंकावा लागतो. श्रमेश ही कसोटी समाधानकारकरीत्या पार पाडण्याची धडपड करताना दिसतोय. जसजसे प्रयोग होत जातील तसतसा एक ठाशीव आकार येत जाईल. श्रमेश बेटकर हा केवळ एक कलाकार नाही, तर तो एक चांगला उत्तम निरीक्षकही आहे. आजूबाजूला घडणाऱया साध्या-सोप्या घटनांमधून विनोद शोधण्याची त्याची हातोटी या कार्यक्रमात सातत्याने जाणवते.
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे, त्याची विषय वैविध्यपूर्ण मांडणी. मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य, मध्यमवर्गीय घरातील सवयी, बदलती काwटुंबिक समीकरणे, कॉर्पोरेट संस्कृती, जेन-झी पिढीची जीवनशैली आणि नातेसंबंधांतील विसंगती या सगळ्या विषयांना तो सहजपणे स्पर्श करतो. विशेष म्हणजे, कुठेही उपदेशाचा सूर न आणता प्रेक्षकांना स्वत-च्या आयुष्याचा आरसाच दाखवतो. म्हणूनच या शोमधील अनेक प्रसंगांवर हसू येते, पण त्याचवेळी “हे तर आपल्याच घरात घडतं’’ ही जाणीवही मनाला स्पर्शून जाते. ही रिलेटेबिलिटीच कार्यक्रमाला वेगळेपण देते. मात्र अशा कार्यक्रमाचा गाभा म्हणजे त्याचा पंटेट होय. त्यावर अधिक-उणे करण्याची आवश्यकता आहे हे नक्की. पूर्वसुरींच्या बळकट खांद्यावर पुढची पिढी नेहमीच उभी असली तरी तुम्ही तुमचे या क्षेत्रातले आदर्श म्हणून कोणाला निवडता आणि त्या निवडीशी किती प्रामाणिक राहता यावर तुमचे यश अवलंबून असते. इथे संहिता अजून कसदार व्हायला हवीय. उत्स्फूर्तता हा सादरीकरणाचा भाग आहे, लेखनाचा नाही हे समजून घ्यायला हवे.
आजकाल स्टँड-अप कॉमेडी म्हटली की अनेकांच्या मनात द्वय़र्थी किंवा अश्लील विनोदांची प्रतिमा तयार होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन असे कार्यक्रम पाहण्याची परंपरा फारशी राहिलेली नाही. ‘थोडं नॉटी, थोडं थॉटी’ची खरी जमेची बाजू म्हणजे ‘नॉटी’ या शब्दाचा अर्थ अश्लीलतेशी जोडला गेलेला नाही. उलट दादा काsंडके यांच्या खटय़ाळ, मिश्कील, शब्दांशी खेळ करणाऱया विनोदपरंपरेचा आधुनिक संदर्भात वापर करत हा कार्यक्रम निरागस खोडकरपणा जपतो. श्रमेशने थोडं
नॉटी आणि थोडं थॉटीचा समतोल बऱयापैकी सांभाळलाय आणि त्यामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना तो सहज स्वीकारता येतो. सूचकता आणि सवंगता याच्या सीमारेषेवर हा ‘थोडं नॉटी’चा खेळ रंगतो. स्टँड-अपमध्ये कलाकाराचा खरा कस लागतो तो प्रेक्षकांशी थेट संवाद साधताना. कोणत्याही पात्राचा आधार नसताना केवळ स्वत-च्या व्यक्तिमत्त्वाच्या बळावर रंगमंच व्यापावा लागतो. श्रमेश हा कस समर्थपणे पेलतो. श्रमेश बेटकरची संवादफेक, चेहऱयावरील हावभाव, योग्य ठिकाणी घेतलेले पॉजेस आणि अचूक कॉमिक टायमिंग ही त्याची आधीपासूनची बलस्थाने येथेही ठळकपणे जाणवतात. मात्र स्टँड-अपमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रत्येक क्षणी बदलत असतो. त्या प्रतिसादानुसार स्वत-ची लय बदलण्याची क्षमता श्रमेशने बाणवून घ्यायला हवीय असे वाटते.
कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती योगेश सोहोनी यांनी केली आहे. सादरीकरणात अनावश्यक तांत्रिक गिमिक्स किंवा भपकेबाजपणा न आणता कलाकारालाच पेंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय योग्य वाटतो. स्टँड-अपचे मूळ सामर्थ्य हे शब्द, निरीक्षण आणि सादरीकरण यात असते आणि हा कार्यक्रम त्याच तत्त्वाशी प्रामाणिक राहतो. अर्थात, हा पहिलाच स्टँड-अप शो असल्यामुळे काही ठिकाणी मांडणी अधिक घट्ट होऊ शकते. काही निरीक्षणे अधिक धारदार करण्याची संधी आहे, तर काही भागांमध्ये विनोद आणि विचार यांचा समतोल आणखी प्रभावीपणे साधता येईल.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियासाठी तयार होणाऱया झटपट विनोदांच्या गर्दीत श्रमेश बेटकरचा हा प्रयत्न वेगळा ठरतो. तो केवळ पंचलाइनवर अवलंबून राहत नाही, तर अनुभवकथन, निरीक्षण आणि सहज संवाद यांच्या आधारावर हास्याची उभारणी करतो. म्हणूनच कार्यक्रम संपल्यानंतर केवळ विनोद आठवत नाहीत, तर त्यामागील विचारही मनात रेंगाळतो. एकूणच ‘थोडं नॉटी, थोडं थॉटी’ हा केवळ स्टँड-अप कॉमेडी शो नाही, तर मराठीतील काwटुंबिक स्टँड-अप संस्कृतीत आपला सहभाग नोंदवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भरभरून हसवतानाच स्वत-च्या आयुष्याकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहायला शिकवणारा हा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांनी जरूर अनुभवावा असा आहे.
लेखक – दिग्दर्शक – सादरकर्ता –
श्रमेश बेटकर
निर्माता – योगेश सोहोनी,
कॉकटेल स्टुडिओ
व्यवस्थापक – सायली कडू
छायाचित्र सौजन्य – टीम कॉकटेल स्टुडिओ