
बंगळुरूमधील एका नामांकित कॉर्पोरेट कॅम्पसमधील डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांचा अमानुष छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सेंटरमध्ये लहान मुलांना वॉशिंग मशिनमध्ये बसवून त्यांच्यावर पाणी ओतणे, रडल्यास त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवणे आणि टॉयलेट जेट स्प्रेने त्यांच्या तोंडावर पाण्याचा मारा करणे, अशा क्रूर पद्धतींने या चिमुकल्यांचा छळ केला जात असल्याचे समोर आले आहे.
या भयंकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी याप्रकरणी 5 महिला केअरटेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या डेकेअर सेंटरमध्ये मुलांवर होणारे हे अत्याचार बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. पूर्वी एका कर्मचाऱ्याने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सुपरवायझरकडे तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकले होते.
हा संपूर्ण प्रकार बंगळुरूमधील नामांकित ‘कॅपजेमिनी’ कंपनीच्या कॅम्पसमध्ये चालवल्या जाणाऱ्या डेकेअर सेंटरमधील आहे. या सेंटरमध्ये सुमारे 50 ते 60 मुलांची नोंदणी झाली आहे. यापैकी 15 ते 20 मुलं येथे येतात. यापूर्वीही असे प्रकार होत असून पुरावे नसल्यामुळे कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, एका तक्रारदाराने समोर आणलेल्या व्हिडिओमुळे चिमुकल्यांवर होणारे अत्याचार समोर आले.
चाइल्ड हेल्पलाइनला मिळालेल्या या व्हिडिओ क्लिप्समध्ये, मुले रडल्यास किंवा त्यांनी आवाज केल्यास त्यांना शांत करण्यासाठी थेट वॉशिंग मशिनमध्ये टाकले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या क्रूर कृत्याची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सध्या पोलिसांनी पाचही आरोपी महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व पुरावे कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.




























































