
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण आणि मुलगा प्रवीण म्हात्रे याच्यावरील बेकायदा बांधकामप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यामुळे शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेयाच्या अडचणी वाढल्या आहेत. म्हात्रे याचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणीसाठी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोशी यांच्या उपोषणानंतर केडीएमसीला जाग आली असून रमेश म्हात्रे यांच्या बेकायदा बांधकामांची फाईल उघडली असून प्रशासकीय पातळीवर झाडाझडती सुरू झाली आहे.
रमेश म्हात्रे याने कोपर परिसरातील खाडीकिनारी कांदळवन नष्ट करून उभारलेल्या बेकायदा चाळी तसेच पालिका निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील खोटी माहिती यांच्या तक्रारी कल्पेश जोशी यांनी शासनाकडे केल्या असून रमेश म्हात्रे याचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी थेट आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीत गोपनीय पद्धतीने रमेश म्हात्रे याची बेकायदा बांधकामे, पालिका डॉक्टरांना ऑन ड्युटी मारहाण आणि त्याच्यावर याआधी असलेले गुन्हे यासंदर्भात माहिती संकलित करून अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल शासनाला पाठवून त्याचे नगरसेवक पद रद्दबाबत मार्गदर्शन मागवले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुक्काम बराक क्रमांक ९
डॉक्टर मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रे याच्यासह रमेश पवार, प्रमोद उर्फ प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे आधारवाडी जेलमध्ये आहेत. कल्याण कोर्टाने या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ३ ऑगस्टपर्यंत त्यांचा मुक्काम जेलमध्ये राहणार आहे. हे सर्व आरोपी बराक क्रमांक ९ मध्ये एकत्रित असल्याचे समजते. दरम्यान घरचे जेवण मिळावे यासाठी रमेश म्हात्रे याने अर्ज केला आहे.
…तर नियमानुसार कारवाई होणार
रमेश म्हात्रे याचा मुलगा प्रवीण म्हात्रे याच्याविरोधात जुनी डोंबिवली परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘आरव हाईट्स’ नावाची इमारत बांधून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या इमारतीबाबत पालिकेकडे यापूर्वी काही तक्रार दाखल झाली असेल तर तपासली जाईल असे ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अभिमान पवार म्हणाले. तर कल्पेश जोशी यांच्या तक्रारीची चौकशी करून त्यात काही तथ्य आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितले.




























































