वेब न्यूज – व्हाईट रॅबिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

आपल्या देशाने व्हाईट रॅबिट (White Rabbit) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हिंदुस्थान प्रमाण वेळ (Indian Standard Time – IST) प्रसारित करण्यासाठी सुरक्षित आणि उच्च अचूकतेचे प्रात्यक्षिक नेटवर्प सुरू केले आहे. या उपक्रमामुळे संरक्षण, बँकिंग, दूरसंचार, वीज वितरण आणि डिजिटल व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना अधिक विश्वासार्ह आणि सायबर हल्ल्यांपासून अधिक सुरक्षित वेळ उपलब्ध होणार आहे. ‘व्हाईट रॅबिट’ हे नाव ऐकायला जरी वेगळे वाटत असले तरी हे प्रत्यक्षातऑप्टिकल फायबरद्वारे अत्यंत अचूक वेळ संक्रमित (Time Synchronisation) करणारे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान नॅनो सेकंद स्तरावरील अचूकता साध्य करू शकते. त्यामुळे देशभरातील विविध संगणक प्रणाली आणि नेटवर्प एकाच प्रमाण वेळेनुसार कार्य करतात. केंद्र सरकारच्या मते, या नेटवर्पमुळे परदेशी वेळ स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि देशाची डिजिटल पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित बनेल. विशेषतः ऑनलाइन बँकिंग व्यवहार, शेअर बाजार, वीज ग्रिड, 5G दूरसंचार सेवा आणि संरक्षण क्षेत्रात अचूक वेळेचे मोठे महत्त्व आहे. काही मायक्रो सेकंदांचा फरकही या सेवांवर परिणाम करू शकतो. बंगळुरू येथील प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेत या प्रात्यक्षिक नेटवर्पचे उद्घाटन करण्यात आले. पुढील काळात या तंत्रज्ञानाचा विस्तार देशातील इतर महत्त्वाच्या केंद्रांपर्यंत करण्याची योजना आहे. हिंदुस्थानातील डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक सुरक्षित, स्वयंपूर्ण आणि जागतिक दर्जाची बनविण्याच्या दिशेने व्हाईट रॅबिट तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आजच्या डिजिटल युगात केवळ अचूक वेळ पुरेशी नसून ती देशभरातील सर्व महत्त्वाच्या यंत्रणांपर्यंत एकाच क्षणी आणि सुरक्षितपणे पोहोचणेही तितकेच आवश्यक आहे. व्हाईट रॅबिट तंत्रज्ञानामुळे हिंदुस्थानला स्वतःची अधिक विश्वासार्ह आणिअनधिकृत हस्तक्षेपापासून सुरक्षित वेळ वितरण व्यवस्था उपलब्ध होणार असून डिजिटल स्वावलंबनाकडे टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हा उपक्रम हिंदुस्थानच्या तांत्रिक स्वावलंबनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. याचा लाभ उद्योग, संशोधन आणि शासकीय यंत्रणांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे.