
हाती उंचावलेला तिरंगा आणि संविधानाची प्रत, राष्ट्रगीताची गुंज, ‘वंदे मातरम’चा जयघोष, ‘जय भीम’ आणि ‘आजादी’चे बुलंद नारे, मनातील भावना व्यक्त करणारे हटकs पोस्टर्स असे देशभक्तीने भारावलेले वातावरण आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दिसून आले. तरुणाईच्या मनातील आनंद आणि जल्लोषाचे विराट दर्शन झाले! शनिवारी दिल्लीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. तब्बल 36 दिवस देशभर पेटलेल्या ‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनाचा विजय झाला. या विजयाचे आज जोरदार सेलिब्रेशन मुंबईत झाले. भरपावसात मुंबईच्या कानाकोपऱयातून आलेल्या तरुणांनी अक्षरशः मैदान मारले. आता थांबायचं नाय, असा निर्धार केला.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तरुणाईच्या एकजुटीचे दर्शन घडले. या विजयी जल्लोषात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा नव्हता. या ठिकाणी हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकत होता. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाईची पावले सकाळी 8 वाजल्यापासून दादरकडे वळली. मुंबई आणि उपनगरांतून जेन झी मोठय़ा संख्येने ट्रेन, मेट्रोने पोहोचू लागले. त्यांच्या हातात तिरंगा आणि क्रिएटिव्ह फलक होते. त्यांच्या चेहऱयावर विजयाचा आनंद होता. त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. जेन झींमध्ये जेन मिलेनियल्सही सामील झाली होती. ‘मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही इथे आलोय’ अशा भावना जनरेशन मिलेनियल्सचे लोक व्यक्त करत होते. काही मुले पालकांसोबत आली होती. अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही रस्त्यावर उतरून, डफ वाजवून, गाणी गात मुलांचा उत्साह वाढवत होते. ‘मोदी सरकारच्या पापाचा घडा भरला’, असे म्हणत घडा घेऊन जल्लोषात सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासूनचा परिसर चोहोबाजूने गर्दीने भरून गेला होता. मधल्या गल्ल्यांमध्ये बॅरिकेड्स लावल्याने तरुणांना अगदी फिरून यावे लागत होते. मात्र तरीही पुणीही चिडचिड न करता मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचायचा प्रयत्न करत होते. जातपात, धर्म, भेदाभेद विसरून सारे एकतेच्या झेंडय़ाखाली जमले.
अनेक जण गटागटाने फोटो – व्हिडीओ काढून सुंदर आठवणी पॅमेऱयात पैद करत होते. आमच्या आयुष्यातील हे पहिले आंदोलन होते, जे आम्ही यशस्वी करून दाखवले. त्यामुळे हे क्षण खूप खास आहेत, अशा प्रतिक्रिया अनेक जेन झींनी दिल्या. केवळ एका राजीनाम्याने आम्ही थांबणार नाही, जिथे चुकीचे घडतंय तिथे आमचा लढा सुरूच राहील. सिस्टीमविरोधात आम्ही लढत राहू, अशा बोलक्या प्रतिक्रिया युवा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
‘शिवतीर्थ’च्या गॅलरीतून गर्दीला अभिवादन…
विजयोत्सवानंतर उद्धव ठाकरे हे बंधू राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले. तेथील गॅलरीतून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी गर्दीला हात उंचावून अभिवादन केले. तेव्हा ‘ठाकरे… ठाकरे’ असा जयघोष तरुणाईने केला. तो क्षण उद्धव ठाकरे यांनी मोबाईलने टिपला. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे त्यांच्यासोबत होते.



























































