
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकन आंतरराष्ट्रीय खेळाडू अखिलेश रेड्डीवर आठ वर्षांची बंदी घातली आहे. हैदराबादमध्ये जन्मलेल्या 26 वर्षीय रेड्डीने भारतात सनरायझर्स हैदराबादसाठी नेट गोलंदाज म्हणून काम केले होते. अखिलेश विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला आहे. त्याने अमेरिकेसाठी चार आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यूएईमधील अबुधाबी टी-10 लीग 2025 दरम्यान सामना निश्चित करण्याचा प्रयत्न करणे, दुसऱया खेळाडूला चिथावणी देणे आणि तपासात अडथळा आणणे या तीन गंभीर आरोपांमध्ये तो दोषी आढळला.
मॅच फिक्सिंगच्या कटाचे पुरावे मिळाले
आयसीसी न्यायाधिकरणाने घातलेली ही बंदी 21 नोव्हेंबर 2025पासून लागू होईल. ज्या दिवशी रेड्डीला प्रथम तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. या निर्णयानंतर तो 21 नोव्हेंबर 2033पर्यंत क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर खेळू शकणार नाही. तोपर्यंत त्याचे वय 34 वर्षांपेक्षा जास्त झालेले असेल. टी-10 लीगमध्ये एस्पीन स्टॅलिअन्स संघाकडून खेळताना सामन्यांचा निकाल आणि कामगिरी प्रभावित करण्याच्या त्याच्या कटाचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर न्यायाधिकरणाने ही कठोर शिक्षा ठोठावली.
हॉटेलच्या खोलीत रचला होता कट
19 नोव्हेंबर 2025 या दिवशी सकाळी सामना सुरू होण्याच्या काही तास आधी संघाच्या हॉटेलमध्ये हे प्रकरण उघडकीस आले. तपासात असे उघड झाले की, रेड्डीने एका सहकाऱयाला गोलंदाजी करताना मुद्दाम धावा देण्यास सांगितले होते. रेड्डीने दावा केला की, ही सूचना संघातील एका वरिष्ठ सदस्याकडून आली होती. पण त्या वरिष्ठ खेळाडूने ही सूचना दिली नसल्याचे सांगितले आणि या घटनेची माहिती त्वरित आपल्या एजंटला व आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली.
30 मिनिटांच्या आत संघातून काढले
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ही गोष्ट म्हणजे, एका खेळाडूचे नाव सुरुवातीला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समाविष्ट होते. पण मॅच फिक्सिंगचा इन्कार केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच त्याला सामन्याच्या संघातून काढून टाकण्यात आले. न्यायाधिकरणाने हे मान्य केले की, रेड्डीने खेळाडूच्या असहकार्याची माहिती तत्काळ संघ व्यवस्थापनाला दिली, ज्यामुळे त्याला वगळण्यात आले. न्यायाधिकरणाने कोणत्याही व्यक्तीविरुद्ध थेट निकाल देण्याचे टाळले असले तरी या संपूर्ण घटनेतून रेड्डीचा हेतू स्पष्टपणे उघड झाला.
डेटा स्वच्छतेचे कारण फेटाळले
अधिकाऱयांनी फोन जप्त करण्याच्या काही वेळ आधी रेड्डीने एका खेळाडूसोबतचा आपला संपूर्ण व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल इतिहास स्वतःच डिलीट केले होते. चौकशीदरम्यान रेड्डीने या कृतीचे कारण सांगताना, आपल्याला ही कायम सवय असल्याचे त्याने सांगितले. पण न्यायाधिकरणाने हा तकलादू युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला आणि मान्य केले की संदेश डिलीट करण्यामागील खरा हेतू गुन्हेगारी पुरावे नष्ट करणे आणि भ्रष्टाचारविरोधी तपासात हेतुपुरस्सर अडथळा आणणे हा होता.



























































