
धावणारी मुंबई आणि धावणे हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग मानणाऱया मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई मॅरेथॉनच्या 22व्या पर्वाच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. येत्या 17 जानेवारी 2027 ला धावणाऱया या मॅरेथॉनची पहिली नोंदणी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली. प्रोपॅम इंटरनॅशनल आयोजित आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल्ड लेबल दर्जा प्राप्त असलेल्या या स्पर्धेत यंदा 3,89,524 अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम असेल. पूर्ण मॅरेथॉन (42.195 किमी) आणि व्हर्च्युअल रनसाठी नोंदणी सुरू झाली असून ती 8 नोव्हेंबर किंवा जागा भरेपर्यंत खुली राहील. अर्ध मॅरेथॉनसाठी नोंदणी 4 ते 18 ऑगस्ट, खुल्या 10 हजार मीटरसाठी 11 ऑगस्ट, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग शर्यतीसाठी 19 ऑगस्ट ते 5 नोव्हेंबर, तर ड्रीम रनसाठी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 या कालावधीत नोंदणी केली होणार आहे.





























































