
माथेरानची राणी अशी जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या मिनी ट्रेनचे स्टेशन आज पाण्याखाली गेले. गेल्या दोन दिवसांपासून कर्जत परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नदी, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत असून नेरळ येथील माथेरान मिनी ट्रेन स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या मिनी ट्रेनची सेवा बंद आहे. मात्र पर्यटकांना याच स्थानकातून जावे लागते.
स्थानक पाण्याखाली गेल्याने पर्यटकांचे मेगा हाल झाले. कर्जत आणि नेरळ परिसरात जोरदार पाऊस पडल्यामुळे मिनी ट्रेनच्या स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रेल्वे मार्ग, प्लॅटफॉर्म, मिनी ट्रेनचे डबे असलेले शेड पूर्णपणे पाण्याखाली गेले. आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असताना दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गातील कचरा हटवून अडथळे दूर केले. त्यामुळे साचलेले पाणी हळू हळू ओसरू लागले आणि परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली.
पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहिला असता तर हे पाणी उलटून मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत या मुख्य मार्गावरील रेल्वे रुळांवर गेले असते आणि मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली असती. मात्र सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने या पाण्याचा निचरा झाला.
नैसर्गिक नाला बंद केला
मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कामामुळे नैसर्गिक नाल्याची वाट बंद झाल्याने या परिसरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचून नदीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची टीका स्थानिक नागरिक करत आहेत. मान्सून काळात माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद असली तरी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना नेरळ स्थानकातून पुढील प्रवासासाठी मिनी ट्रेन स्थानक परिसरातून जावे लागते. आज दिवसभर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.




























































