
तू बोगस डॉक्टर आहेस, १० हजार दे नाही तर धाड टाकीन, अशी धमकी देत पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या बोर्ली पंचतनच्या लाचखोर आरोग्य सहाय्यकाला अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. घनश्याम कोमटवार असे लाचखोर आरोग्य सहाय्यकाचे नाव आहे. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
लाचखोर धनश्याम कोमटवार याने तक्रारदाराला ‘तू बोगस डॉक्टर आहेस. तुझ्यावरती धाड टाकीन’ अशी धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे दहा हजारांची मागणी केली. ही रक्कम तडजोडीअंती ५ हजार रुपये ठरली. याची माहिती तक्रारदाराने अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर एसीबीने आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचला. धनश्याम पैसे घेण्यासाठी आला असता तक्रारदाराने प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने त्याला रस्त्यावर बोलावून घेतले. त्याचवेळी पाच हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
परिसरात खळबळ
बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घनश्याम कोमटवार हा आरोग्य सहाय्यक या तृतीय श्रेणी पदावर कार्यरत आहे. तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण करकर, पोलीस हवालदार महेश पाटील, नवदित नांदगावकर यांच्या पथकाने केली.



























































