ठाणे झेडपीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 526 शिक्षक; जिल्हा परिषद करणार मेगाभरती दर्जेदार शिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे झेडपीच्या विद्यार्थ्यांना लवकरच तब्बल ५२६ नवीन शिक्षक मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मराठी माध्यमाची ४९९ तर उर्दू माध्यमाची २७ अशी एकूण ५२६ प्राथमिक शिक्षक पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नियमांअभावी शैक्षणिक नुकसान होणाऱ्या झेडपीतील हजारो विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ३७९ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये जवळपास ७० ते ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला होता. त्यानुसार प्रत्येक शाळेत किमान दोन नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहेत. नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ कमी होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर पूर्ण अभ्यासक्रम शिकता येईल, असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे.

  • शासनाच्या नियमानुसार पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. उमेदवारांनी पसंतीक्रम भरताना जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीची काळजीपूर्वक माहिती घेऊनच प्रक्रिया पूर्ण करावी.
  • उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान सादर केलेली वैयक्तिक, शैक्षणिक व व्यावसायिक माहिती अचूक असल्याची खात्री करावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती सादर झाल्यास ती जबाबदारी त्या उमेदवाराची राहील.
  • पवित्र पोर्टलवरील जाहिरात, पदांची माहिती, पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील सूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी tait2025. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

निकष, आरक्षणाच्या तरतुदी तपासून घ्याव्यात

शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचून त्यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, निकष तसेच आरक्षणासंदर्भातील तरतुदी तपासून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी

उमेदवारांनी आपला पसंतीक्रम ११ ऑगस्टपर्यंत नोंदवावा. मुदतीनंतर अर्ज किंवा पसंतीक्रमाबाबत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दोन दिवसांत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

  • शिक्षक भरती प्रक्रियेची माहिती केवळ अधिकृत पवित्र पोर्टलवरूनच घ्यावी. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ अथवा अनधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीवर अवलंबून राहू नये.
  • जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी पदांचा तपशील व जाहिरातीतील सर्व अटी व शर्ती वाचून येत्या मंगळवारपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.