‘स्वच्छता सेवा योजने’वरून भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई, गटनेत्यांच्या बैठकीआधीच सभागृह नेत्यांकडून घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली अनेक वर्षे मुंबई आणि उपनगरांतील झोपडपट्टय़ांच्या स्वच्छतेसाठी राबवली जाणारी ‘दत्तक वस्ती योजना’ आता नव्या स्वरूपात येणार आहे. बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना (बीएसएसवाय) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला येणार होता. मात्र ही बैठक होण्याआधी किंवा प्रस्तावावर चर्चा होण्याआधी भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘बीएसएसवाय’ योजना जाहीर केली. यामुळे सत्ताधारी भाजपमधील श्रेयवादाच्या चढाओढीची चर्चा रंगली. याआधी मुंबईतील इमारतींना अभय योजनेअंतर्गत ओसी देण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावावेळी अशीच अंतर्गत स्पर्धा दिसून आली होती.

मुंबईतील झोपडपट्टय़ा आणि वस्त्यांमधील साफसफाई आणि स्वच्छता आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजनेंतर्गत केली जाणार आहे. आधीच्या दत्तक वस्ती योजनेपेक्षा या योजनेचे स्वरूप वेगळे असेल. केवळ घरगुती कचरा संकलन आणि गल्ली स्वच्छता असे या योजनेचे स्वरूप आहे. त्याआधी महापालिका दर महिन्याला 11.34 कोटी आणि वर्षाला 136 कोटी रुपये खर्च करणार आहे. योजनेत कचऱयाच्या कामावर देखरेख आणि कामाची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा दावा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजनेत स्वच्छतादूतांचे मानधन वाढवले जाईल. त्यांचे सध्याचे मानधन 6 हजार रुपये आहे. ते थेट 11 हजार रुपये केले जाईल. झोपडपट्टय़ा, चाळींमध्ये नियमित सफाई, कचरा संकलन आणि नाले गटारांची सफाई अशी कामे त्यांना करावी लागतील. मुंबई साधारण 980 संस्था हे काम करत आहेत.

नगरसेवक निधीमधून खासगी सोसायट्यांची कामे

नगरसेवकांना आपल्या निधीचा वापर खासगी गृहनिर्माण सोसायटय़ांमधील नागरी सुविधा कामांसाठी करता यावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव आणण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली. यामुळे खासगी गृहनिर्माण सोसायटय़ांमधील उद्यांनाचा विकास, बोअरवेल, किंवा अंतर्गत रस्ता अशी कामे करणे शक्य होईल. सध्या या कामासाठी नगरसेवकांना निधी वापरता येत नसल्याचे खणकर यांनी सांगितले.