
आयुष्यभराची जमापुंजी एका सेवानिवृत्त वृद्धेला अटकेच्या भीतीपोटी गमवावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सायबर भामटय़ांनी एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवत एका मनी लॉंडरिंगच्या गुह्यात अटक केल्याचे सांगत डिजिटल अटक करून वृद्धेला तब्बल सात कोटी 21 लाख 24 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
68 वर्षीय वृद्धा धोबी तलाव परिसरात राहतात. सध्या त्या निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत आहेत. आयुष्यभर कमावलेल्या पैशांवर त्यांचा उदारनिर्वाह सुरू होता. दरम्यान, 8 एप्रिल रोजी त्यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आले आणि समोरच्या व्यक्तीने त्यांना डाटा प्रोसेसिंग युनिट, नाशिक पोलीस ठाणे, एनआयए अधिकारी असल्याची ओळख सांगितली. मग तुमच्या नावाचे बॅंक खाते एका मनी लॉंडरिंक स्पॅममध्ये आले असून त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या बॅंक खात्याचा तपास करायचा असून तुम्हाला अटक करावी लागेल, अशी धमकी देत आरोपीने त्यांना डिजिटल अटक केली आणि त्याआधारे 8 एप्रिल ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत तब्बल सात कोटी 21 लाख 24 हजार रुपयांचा गंडा घातला. इतकी रक्कम वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर त्यांना वळती करायला भाग पाडले. अखेर आपली पद्धतशीर फसवणूक झाल्याचे वृद्धेच्या लक्षात येताच त्यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वृद्धेच्या तक्रारीवरून दक्षिण सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.


























































