धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नौपाड्यातील हरिनिवासा चौकातील निकमवाडी येथील सुमारे ७० वर्षे जुन्या एकमजली धोकादायक इमारतीच्या सज्जाचा भाग अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र इमारत धोकादायक स्थितीत असल्याने पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांना इमारतीत न राहण्याच्या सूचना दिल्या.

ठाणे पश्चिमेकडील हरिनिवासा चौकातील हनुमान मंदिराजवळील निकमवाडी येथे ‘निकम हाऊस’ ही ७० वर्षे जुनी एकमजली इमारत आहे. ठाणे महापालिकेने यापूर्वीच ही इमारत धोकादायक घोषित करून ती रिकामी करण्यासह संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. रविवारी या इमारतीच्या सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत वास्तव्य करणाऱ्या निकम कुटुंबीयांना सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीत न राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीची पाहणी करून पुढील आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.