मुद्दा – निर्णयाची प्रतीक्षा संपणार कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< प्रकाश कारेकर

हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस म्हणजे 16 एप्रिल, 1853. मुंबईच्या बोरीबंदरहून ठाण्याकडे हिंदुस्थानातील पहिली प्रवासी रेल्वे धावली. या ऐतिहासिक पर्वाच्या उभारणीत मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ ‘नाना’ शंकरशेट यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. आधुनिक मुंबईच्या जडणघडणीत शिक्षण, समाजसुधारणा, सार्वजनिक सुविधा आणि दळणवळणाच्या क्षेत्रात नानांनी दूरदृष्टीने केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. ज्या मुंबईच्या विकासासाठी नानांनी आपले आयुष्य झोपून दिले, त्याच मुंबईतील मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ असे नामकरण व्हावे, ही मागणी महाराष्ट्राच्या जनमानसातून पुढे आली. महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये हा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला. आज सन 2026 सुरू आहे. सहा वर्षे झाली! मात्र प्रस्ताव अद्याप अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रश्न केवळ एका रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा नाही, प्रश्न आहे तो इतिहासाचा सन्मान करण्याचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि आपल्या पूर्वसुरींच्या योगदानाची कृतज्ञतेने नोंद घेण्याचा.

नाना शंकरशेट हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही. ते मुंबईच्या आधुनिक जडणघडणीचे एक महत्त्वाचे पर्व आहे. शिक्षणाचा प्रसार, मुलींच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, सार्वजनिक संस्था उभारण्यातील सहभाग आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला पुढाकार या सर्व कार्यातून नानांचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात अढळपणे उभे आहे.

हिंदुस्थानात पहिली रेल्वे धावली, त्या ऐतिहासिक घटनेशी नानांचे नाव जोडलेले असताना त्यांच्या नावाचा सन्मान करण्यासाठी मंजूर झालेला प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे ही निश्चितच खंत निर्माण करणारी बाब आहे. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला, केंद्राकडे पाठविला, आता पुढची जबाबदारी कोणाची? सहा वर्षांचा काळ हा कोणत्याही शासकीय प्रस्तावासाठी कमी नाही. नानांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे; पण त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष नामकरणाचा फलक मुंबई सेंट्रलवर कधी दिसणार, हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारत आहे.

ज्यांनी मुंबईच्या भवितव्याचा विचार दीडशे वर्षांपूर्वी केला, त्यांच्या नावासाठी आजच्या काळात सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणे हे दुर्दैव आहे. इतिहास विसरणाऱ्या समाजाला भविष्य घडविण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. नाना शंकरशेट यांच्यासारख्या द्रष्ट्या महापुरुषांचे योगदान केवळ जयंती-पुण्यतिथीपुरते मर्यादित न राहता सार्वजनिक स्मारकांमध्ये, संस्थांच्या नावांमध्ये आणि लोकांच्या दैनंदिन स्मरणात जिवंत राहिले पाहिजे. म्हणूनच आता गरज आहे ती शासकीय पत्रव्यवहाराच्या पुढच्या टप्प्याची नव्हे, तर ठोस निर्णयाची. ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ हे नाव मुंबईच्या भूमीवर अभिमानाने झळकले पाहिजे.

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आता महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा आणि नाना शंकरशेट यांच्या नावाचा सन्मान प्रत्यक्षात उतरवावा, हीच तमाम महाराष्ट्राची अपेक्षा आहे.

कारण हा केवळ नामकरणाचा प्रश्न नाही. ही आपल्या इतिहासाप्रति व्यक्त करावयाची कृतज्ञता आहे. ही मुंबई घडविणाऱ्या एका द्रष्ट्या मराठी माणसाला वाहिलेली आदरांजली आहे आणि म्हणूनच प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा राहतो, नाना शंकरशेट यांच्या नावाची ही प्रतीक्षा संपणार कधी?