
अतिशय आक्रमक पद्धतीने खेळल्या गेलेल्या लढतीत हिंदुस्थानच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 7-3 गोल फरकाने धुव्वा उडवत ज्युनियर आशिया करंडक स्पर्धेच्या ‘अ’ गटात आपली आघाडी आणखी भक्कम केली. सुरुवातीची तीन क्वार्टर चुरशीच्या ठरल्यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी अक्षरशः गोलांचा धडाका लावत सामना कोरियाच्या हातातून हिसकावून घेतला. या विजयासह हिंदुस्थानचे 3 सामन्यांत 7 गुण झाले असून सेमीफायनलचे तिकीट आता जवळपास पक्के झाले आहे.
पाचव्या मिनिटाला अनमोल एक्काने पेनल्टी का@र्नरवर गोल करत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली, मात्र पुढच्याच मिनिटाला दक्षिण कोरियाच्या डोह्योन चोईने पेनल्टी का@र्नरवर गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रावर हल्ले चढवत सामना रंगतदार ठेवला. 18 व्या मिनिटाला लवनूर सिंहने मैदानी गोल करत हिंदुस्थानला पुन्हा आघाडी मिळवून दिली, मात्र अवघ्या एका मिनिटात ह्योगुक यूने कोरियाला पुन्हा बरोबरी साधून दिली. त्यानंतर 20 व्या मिनिटाला अजित यादवने गोल करत हिंदुस्थानला मध्यंतरापर्यंत 3-2 अशी आघाडी मिळवली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाच्या ह्योगुक यूने सहाव्याच मिनिटात वैयक्तिक दुसरा गोल करत पुन्हा एकदा सामना 3-3 असा बरोबरीत आणला, मात्र हिंदुस्थानी खेळाडूंनी निर्णायक क्षणी आक्रमणाची धार वाढवली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस प्रभदीप सिंहने 42 व्या मिनिटाला गोल करत हिंदुस्थानला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानी संघाने अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत तीन गोल करत सामन्याचे चित्रच पालटले. गुरसेवक सिंहने 55 व्या मिनिटाला गोल करत हिंदुस्थानची आघाडी 5-3 अशी केली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला अनमोल एक्काने पेनल्टी का@र्नरवर आपला दुसरा गोल करत हिंदुस्थानची आघाडी 6-3 वर नेली. अखेर 58 व्या मिनिटाला आर्यन जेसने गोल करत हिंदुस्थानच्या 7-3 अशा दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
कर्णधार आणि हिंदुस्थानचा स्टार ड्रगफ्लिकर अनमोल एक्काने या सामन्यात दोन गोल करत आपली वैयक्तिक गोलसंख्या आठवर नेली आहे. त्याच्या भेदक ड्रगफ्लिकसमोर प्रतिस्पर्ध्यांचे बचाव पुन्हा एकदा निष्प्रभ ठरले.



























































