‘एमपीएससी’, ‘नीट’ पेपरफुटीच्या सर्व रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि ‘नीट’सह विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या सर्व रॅकेटमध्ये भाजपचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी गुंतले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. नागपूरमध्ये एका कार्यक्रमप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात गेल्या दहा वर्षांपासून देवेंद्र फडणवीस सत्तेत असूनही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. सोमवारी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर आता सरकार टास्क पर्ह्स नेमण्याचे नाटक करत आहे, असा घणाघात त्यांनी केला. निष्फळ ठरलेला लोकसेवा आयोग तातडीने बरखास्त करून नव्याने पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकार पूर्णपणे असंवेदनशील असल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूरचेच मुख्यमंत्री आणि विदर्भातील अनेक मंत्री पॅबिनेटमध्ये असतानाही आत्महत्येच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत जाहीर केली जात नाही. सरकारमधील मंत्री केवळ गरबा, मुसलमान आणि पाकिस्तानवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांच्या संकटावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

उपराजधानीत दहीहंडी उत्साहात

नागपूरच्या वाडी शहरातील काटोल बायपास रोड येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात भव्य दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेता श्रेयस तळपदे यांनी उत्सवाला उपस्थिती लावल्याने सोहळ्यात रंगत आली. हर्षल काकडे मित्रपरिवाराने या उत्सवाचे आयोजन केले होते.