मध्यावधी – ठरवणार भवितव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

अमेरिकेमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत तीन प्रकारचे निकाल समोर येऊ शकतात. पहिल्या शक्यतेनुसार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये डेपॉटिक पक्षाला बहुमत मिळेल आणि सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कायम राहील. दुसऱ्या शक्यतेनुसार दोन्ही सभागृहांमध्ये डेपॉटिक पक्ष बहुमत मिळवेल. तिसरी शक्यता म्हणजे, रिपब्लिकन पक्ष दोन्ही सभागृहांवरील आपले वर्चस्व टिकवून ठेवेल. सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेतले तर तिसरी शक्यता तुलनेने कमी वाटते. डेमोक्रेटिक पक्षाला दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळाल्यास ट्रम्प यांच्यासाठी आगामी दोन वर्षे आव्हानात्मक ठरतील हे निश्चित.

अमेरिकेमध्ये येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुका अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर जागतिक राजकारणावरही त्यांचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये स्वीकारलेली आाढमक परराष्ट्र धोरणे, विविध देशांवर लादलेले आयात शुल्क, इराणबरोबरचा लष्करी संघर्ष आणि अन्य देशांविरुद्ध लष्करी कारवाई करण्याची त्यांची भूमिका या सगळ्यांचे भवितव्य या निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला पराभव स्वीकारावा लागला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रीयाही सुरू होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

ट्रम्प प्रशासन इराणविरुद्ध नव्या लष्करी मोहिमेची योजना आखत असल्याची चर्चा सुरू आहे. इराणवर अत्यंत शक्तिशाली बॉम्ब टाकण्याची भाषाही ट्रम्प यांच्याकडून केली जात आहे. व्हेनेझुएलासारखी लष्करी कारवाई क्युबामध्ये करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. आखातातील संघर्षावर झालेल्या खर्चासाठी अमेरिकन काँग्रेसकडे मोठय़ा निधीची मागणी करण्यात आली आहे. या सर्व निर्णयांचे भवितव्य मध्यावधी निवडणुकीनंतर स्पष्ट होऊ शकते.

अमेरिकेमध्ये दोन वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा निवडणुका कशासाठी होत आहेत, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्याचे उत्तर अमेरिकेच्या राजकीय आणि घटनात्मक व्यवस्थेमध्ये दडलेले आहे.

भारतामध्ये ज्याप्रमाणे संसद आहे त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये `काँग्रेस’ ही कायदेमंडळाची सर्वोच्च संस्था आहे. भारतीय संसदेची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृहे आहेत. अमेरिकन काँग्रेसचीही दोन सभागृहे आहेत. त्यातील कनिष्ठ सभागृहाला `हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्’ असे म्हणतात, तर वरिष्ठ सभागृहाला `सिनेट’ असे संबोधले जाते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्ची सदस्य संख्या 435 आहे, तर सिनेटमध्ये 100 सदस्य आहेत. अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्ये असून प्रत्येक राज्यातून दोन प्रतिनिधी सिनेटवर निवडले जातात.

या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा कार्यकाळ वेगवेगळा असतो. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मधील सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असल्यामुळे दर दोन वर्षांनी सर्व 435 जागांसाठी निवडणुका होतात. सिनेटच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यामुळे सिनेटमधील सर्व सदस्य एकाच वेळी निवडले जात नाहीत. यंदाच्या नोव्हेंबरमधील निवडणुकीत सिनेटच्या सुमारे एकतृतीयांश जागांसाठी मतदान होणार आहे. अशा प्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर काँग्रेसच्या निवडणुका होत असल्यामुळे त्यांना मध्यावधी निवडणुका म्हटले जाते. या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष स्वत: उमेदवार नसतात. मतदार राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान करत नाहीत. तरीही या निवडणुका राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याचे कारण म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी पहिल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन या निवडणुकांच्या माध्यमातून होते. राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांबद्दल जनतेमध्ये समाधान आहे की असंतोष याचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटते. त्यामुळे मध्यावधी निवडणुका म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या दोन वर्षांच्या कारभाराबद्दल जनतेने दिलेला कौल मानला जातो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने आाढमक आयात शुल्क धोरण स्वीकारले. भारतावर 50 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादण्याची भूमिका त्यांनी घेतली. चीनच्या बाबतीत तर 150 ते 200 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढवण्याच्या घोषणा करण्यात आल्या. जगातील अनेक देशांवर मोठय़ा प्रमाणात आयात शुल्क लादण्यात आले. या धोरणामागे अमेरिकन अर्थव्यवस्थेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढणे आणि आयात शुल्काच्या माध्यमातून सरकारचा महसूल वाढवणे हा उद्देश होता, परंतु या धोरणामुळे उलट अमेरिकेच्याच आर्थिक अडचणी वाढल्याचे चित्र निर्माण झाले. आयात शुल्काच्या निर्णयांना न्यायालयीन पातळीवरही आव्हान मिळाले. त्यामुळे ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे इराणविरुद्ध स्वीकारलेल्या आाढमक लष्करी धोरणामुळे अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागल्याचे मी मानतो. आखातातील संघर्षातून इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा उद्देश साध्य झाला नाही. उलट अमेरिकेच्या लष्करी साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याचे दावे समोर आले. अमेरिकेची लढाऊ विमाने, हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्रांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षामुळे अमेरिकेच्या संरक्षण खर्चात मोठी वाढ झाली आहे.

इराणबरोबरच्या संघर्षाचा परिणाम जागतिक तेलबाजारावरही झाला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीवर निर्बंध आल्यामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्या. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले तेव्हा ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत साधारण 60 ते 65 डॉलर प्रतिबॅरल होती. ती पुढे 110 डॉलरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम अमेरिकेतील महागाईवर झाला. पेट्रोल आणि इंधनाबरोबरच दूध, अंडी, ब्रेड यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांच्या खर्चात वाढ झाली. अमेरिकेतील महागाईचा दर दोन टक्क्यांच्या आसपास असताना तो चार टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले.

या सर्व घडामोडींचा परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर होत आहे. यापूर्वी जो बायडेन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यावर झालेल्या निवडणुकांमध्येही महागाई आणि आर्थिक प्रश्न महत्त्वाचे ठरले होते. सध्या ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचे प्रमाण त्या काळातील बायडेन यांच्या लोकप्रियतेपेक्षाही कमी असल्याचे काही सर्वेक्षणांमधून दिसते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसण्याची शयता नाकारता येत नाही.

या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये डेपॉटिक पक्षाला बहुमत मिळाले आणि सिनेटमध्येही त्यांचे वर्चस्व निर्माण झाले तर ट्रम्प यांच्या अडचणी वाढू शकतात. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेस यांच्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले आहे. अमेरिकन काँग्रेसला कायदे करणे, आर्थिक तरतुदींवर नियंत्रण ठेवणे आणि राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयांवर घटनात्मक नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आहेत. युद्ध घोषित करण्याचा अधिकारही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसमधील बहुमत बदलल्यास राष्ट्राध्यक्षांच्या निर्णय स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

अमेरिकन काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम राहिले तर ट्रम्प यांना आपली धोरणे पुढे नेणे तुलनेने सोपे जाईल, परंतु डेमोक्रेटिक पक्षाचे वर्चस्व वाढल्यास त्यांना आपली भूमिका बदलावी लागू शकते. भारतासारख्या देशांबरोबरच्या व्यापारविषयक संबंधांमध्येही त्याचा परिणाम दिसू शकतो. आयात शुल्काचे धोरण, रशियन तेल खरेदीबाबतची अमेरिकेची भूमिका आणि द्विपक्षीय व्यापार करार यांसारख्या विषयांवर ट्रम्प प्रशासनाला अधिक लवचीक धोरण स्वीकारावे लागू शकते. म्हणूनच 3 नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुका अमेरिकेच्या राजकारणापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. इराणवर पुन्हा लष्करी कारवाई होणार का? क्युबा किंवा अन्य देशांविरुद्ध अमेरिका आाढमक भूमिका घेणार का? आयात शुल्काच्या माध्यमातून सुरू असलेला व्यापार संघर्ष पुढे चालू राहणार का? आणि ट्रम्प यांना त्यांच्या उर्वरित कार्यकाळात आपली धोरणे कितपत राबवता येणार? या सर्व प्रश्नांची दिशा या निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होईल. अमेरिकन काँग्रेसमधील सत्तासमीकरण बदलले तर त्याचे परिणाम जागतिक राजकारणावरही उमटतील. त्यामुळे 3 नोव्हेंबरला अमेरिकन मतदार कोणता कौल देतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

ह अमेरिकेत 3 नोव्हेंबरला होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांकडे भारताचेही लक्ष लागले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करार, भारतावरील आयात शुल्क आणि रशियाकडून भारताने खनिज तेल खरेदी करण्याच्या मुद्दय़ावरून निर्माण झालेला तणाव या सर्व बाबी अमेरिकेतील राजकीय घडामोडींशी संबंधित आहेत. प्रे.ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला सध्या स्थगिती दिलेली असली तरी त्यांच्या धोरणांमध्ये सातत्य राहील याची खात्री देता येत नाही. ट्रम्प यांच्या निर्णयांमध्ये अनिश्चितता हा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत)