
>> अरूण
जगात सध्या छोटे-मोठे मिळून 195 स्वतंत्र देश आहेत. त्यामध्ये रशिया आकाराने सर्वात मोठा आहे. त्याचं क्षेत्रफळ सुमारे 1 कोटी 70 लाख चौरस किलोमीटर आहे. तर व्हॅटिकन शहर हा सर्वात छोटा देश असून त्याचं क्षेत्रफळ अवघं 0.44 चौरस किलोमीटर एवढंच आहे… आणि येत्या काही काळात ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्याने सागराची पातळी वाढत जाऊन ‘बुडितखाती’ जमा होत असलेल्या ‘टुवाळू’ बेटाचं क्षेत्रफळ 25 चौरस किलोमीटर आहे. त्याविषयी आपण पूर्वी ‘सामना’मधून वाचलंय.
तसं पाहिलं तर टुवाळू बेट अगदीच काही लहान नाही, परंतु चहूबाजूच्या पॅसिफिक महासागराच्या रोरावला लाटांचा रेटाच एवढा जबरदस्त आहे की ते लवकरच बुडणार आहे. टुवाळू हा हवाई बेटं आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये असलेला सागरी देश आहे. 676 चौरस किलोमीटरचा हा देश म्हणजे 9 बेटांचा समूह असून तेथील लोकसंख्या 9 ते 11 हजार एवढीच आहे. म्हणजे आपल्याकडच्या एखाद्या छोटय़ा गावाइतकी.
पायाखालची जमीनच बुडायला लागलेले टुवाळूकर आता हळूहळू ऑस्ट्रेलियात जात आहेत. मात्र आपल्याला ‘टुवाळू’कर म्हणूनच ओळखलं जावं आणि टुवाळूचे स्वतंत्र नागरिक मानलं जावं अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या अस्तित्वाच्या नि सत्त्वाच्या खुणा ते पुसून टाकायला तयार नाहीत. मात्र अशी ‘राष्ट्रीय’ अस्मिता त्याना दुसऱया राष्ट्रात टिकवावी लागणार आहे.
मुळात एखादा बुडून गेलेला भूभाग नंतरही ‘देश’ म्हणून राहू शकतो का? याचं उत्तर ‘होय’ असं आहे. जगात ‘टुवाळू’ला स्वतंत्र देश म्हणून मिळालेली मान्यता कायम राहणार असून राहती जमीन बुडाली तरी टुवाळूकरांचं राष्ट्रीयत्व बुडणार नाही!
2023 मध्येच, या देशातील लोकांनी त्यांच्या राज्यघटनेत बदल करून, ‘टुवाळू’ सदैव स्वतंत्र राष्ट्र असेल असं घोषित केलं. त्याला संयुक्त राष्ट्रसंघानेही दुजोरा देताना स्पष्टपणे म्हटलं की, भूमी नष्ट झाली तरी एखाद्या राष्ट्राचं राष्ट्रीयत्व संपत नाहीत आणि त्याच्या पूर्वीच्या भूमी तसंच सागरी सीमा तशाच राहतात. टुवाळूचे लोक जिकडे स्थलांतरित होतायत् अशा ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्स या देशांशी त्यांनी असेच करार केले आहेत.
केवळ अकरा हजार लोकांच्या स्वातंत्र्यांची ऊर्मी जपण्यासाठी संयुक्त राष्ट्रही एका राष्ट्रीयत्व या तत्त्वाचा आधार घेऊन विस्थापित टुवाळूना आधार देत आहे हे सध्याच्या अनेक कारणांनी विस्कटल्या जगात कौतुकास्पद म्हणावं लागेल.




























































