
>> श्रद्धा मोरे
आजचे युग हे गतिमान तंत्रज्ञानाचे आणि डिजिटल क्रांतीचे युग आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या ‘गुड नाईट’ मेसेजपर्यंत आपण पूर्णपणे स्क्रीनच्या आहारी गेलो आहोत. अलार्मच्या भोंग्याने उठल्यावर स्नानविधीऐवजी सकाळची किमान 10-15 मिनिटे ‘गुड मार्ंनग’ मेसेज बघण्यात व त्याचे रिप्लाय देण्यातच वाया घालवली जातात आणि मग स्टेटसचा बाजार उजाडतो. स्मार्टफोनच्या या जगात सध्या ज्या एका गोष्टीने संपूर्ण तरुण पिढीला आणि आबालवृद्धांना वेड लावले आहे, ती गोष्ट म्हणजे ‘इन्स्टाग्राम रील्स’ किंवा ‘शॉर्ट व्हिडीओ’. 15 ते 60 सेकंदांच्या या आभासी जगात आजची पिढी इतकी हरवून गेली आहे की, कधीकाळी माणसाचा सर्वात चांगला मित्र मानली जाणारी ‘पुस्तके’ आणि त्यांची सुगंधी पाने कुठेतरी कोपऱ्यात धूळ खात पडली आहेत. रील्सचे गणित हे मानवी मनाच्या चंचलतेवर आधारित आहे. एकामागून एक येणारे रंगीबेरंगी व्हिडीओ, पार्श्वभूमीला वाजणारे संगीत आणि काही सेकंदांत मिळणारे मनोरंजन यामुळे मेंदूला ‘डोपामाईन’चा झटपट डोस मिळतो. याउलट, पुस्तक वाचण्यासाठी शांतता, एकाग्रता आणि वेळेची गुंतवणूक करावी लागते.
जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा लेखक केवळ शब्द लिहितो; पण त्या शब्दांवरून मनातले चित्र वाचक स्वतःच्या कल्पनाशक्तीने रंगवतो. पुस्तकातील पात्रांचा चेहरा कसा असेल, तिथली सृष्टी कशी असेल, हे वाचक स्वत-ठरवतो, परंतु रील्समध्ये प्रत्येक गोष्ट तयार (Ready-made) मिळते. तिथे डोक्याला किंवा कल्पनाशक्तीला वावच उरत नाही. परिणामी, रील्सच्या सततच्या भडिमारामुळे माणसाची विचार करण्याची आणि चिकित्सक दृष्टी नष्ट होत चालली आहे. रील्सच्या माध्यमातून आज केवळ वरवरची प्राथमिक माहिती (Information) मिळत आहे, सखोल ज्ञानाचे आकलन होत नाही. सध्याचे रील्सचे युग हे माहितीचा सुकाळ, पण ज्ञानाचा दुष्काळ निर्माण करणारे ठरत आहे. अनेकदा 15 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये अर्धवट किंवा चुकीची माहिती पसरवली जाते. पुस्तके माणसाला समृद्ध करतात, विचारांना प्रगल्भ बनवतात आणि जगण्याला सुजाणता देतात याचं भान उरलेलं नाही. एका पुस्तकाच्या पानात जेवढी खोली असते, तेवढी खोली हजारो रील्स मिळूनही देऊ शकत नाहीत हे स्वीकारण्याची क्षमता आताच्या पिढीत उरली नाही. आपण माहितीच्या महापुरात वाहत चाललो आहोत, पण ज्ञानाच्या बाबतीत मात्र कोरडेच राहिलो आहोत हे सत्य नजरेआड होताना दिसतेय. कधीकाळी घराघरांमध्ये असणारी पुस्तकांच्या कपाटाची जागा आता शोभेच्या वस्तूंनी घेतली आहे. रेल्वे, बस किंवा प्रवासात पूर्वी लोकांच्या हातात पेपर, पुस्तके दिसायची, तिथे आता कानात इअरपह्न आणि डोळे स्क्रीनवर खिळलेले दिसतात. वाचन संस्कृती लोप पावत चालल्यामुळे भाषेचा दर्जा खालावत आहे, शब्दसंग्रह मर्यादित होत चालला आहे आणि माणसांमधील संवाद संपून केवळ ‘डिजिटल रिअॅक्शन्स’ उरल्या आहेत. तंत्रज्ञान किंवा सोशल मीडिया वाईट नाही, पण त्याचा अतिवापर घातक आहे. आपल्याला डिजिटल जगातून पूर्णपणे बाहेर पडणे शक्य नसले तरी रील्स स्क्रोल करण्याचा वेळ कमी करून दिवसातील किमान 15 ते 20 मिनिटे पुस्तक वाचनासाठी देणे गरजेचे आहे. आज ‘बुकस्टाग्राम’ (Bookstagram) किंवा ‘बुकटॉक’च्या (BookTok) माध्यमातून काही तरुण रील्सचा वापर पुस्तकांचा प्रचार करण्यासाठी करत आहेत, ही एक सकारात्मक बाजू आहे. डिजिटल माध्यमांचा वापर फक्त पुस्तकाची ओळख करून घेण्यासाठी करावा, पण मूळ आनंद पुस्तकाची पाने उलटूनच घ्यावा. थोडक्यात,पुस्तकाचे पान हे केवळ कागद नसतो, तर तो एका लेखकाच्या अनुभवाचा, विचारांचा आणि भावनांचा जिवंत दस्तऐवज असतो. स्क्रीनवरचा प्रकाश डोळ्यांना तात्पुरता आनंद देऊ शकतो, पण पुस्तकातील अक्षरांचा प्रकाश माणसाचे आयुष्य उजळून टाकतो. रील्सच्या या आभासी आणि क्षणभंगुर जगात स्वतःला हरवू न देता पुस्तकांची हरवलेली पाने पुन्हा शोधण्याची आणि ती मनापासून वाचण्याची आज अत्यंत गरज आहे.



























































