
वैश्विक
‘जात कहां हो?’ असा ‘गोल्डन डिस्क’वरचा स्वर सोबत घेऊन 5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉएजर-1 उडाले तेव्हा 2026 च्या 10 नोव्हेंबरला 1 प्रकाशदिवस म्हणजे तब्बल 25 अब्ज 92 कोटी किलोमीटर अंतर पार करून जाईल याची कल्पना नव्हती, असे मुळीच नाही. कारण ‘नासा’ने त्याची रचनाच ते सौरमालेपलीकडे जाऊन ‘इन्टरस्टेलर’ किंवा आंतरतारकीय भागात जाऊन त्याचा अभ्यास करावा असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवले होते. त्यासाठी या यानाला 18 ते 20 अब्ज किलोमीटरचा प्रवास करावा लागेल तेव्हाच ते सूर्यतेजाची मर्यादा (हेलिओपॉज) ओलांडेल याची पूर्वकल्पना होती.
व्हॉएजर-1 ने हे कार्य 2012 मध्ये 25 ऑगस्टला सफल करून दाखवले. हेलिओपॉज म्हणजे सूर्याची संरक्षक मॅग्नेटिक फिल्ड किंवा विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे. ते आणि तीक्र सौरवाऱयांपासून स्वतःचा बचाव करत व्हॉएजर-1 ने आंतरतारकीय भागात प्रवेश केला. या भागाला आंतरतारकीय का म्हणायचे, तर सूर्य हा आपल्या जवळचा तारा आहे. इतर असंख्य तारे अंतराळात आहेत. त्याचे प्रत्येकाचे एक प्रभावक्षेत्र आहे. सूर्याच्या प्रभाव क्षेत्रापलीकडे हा आंतरतारकीय अंतराळी भाग सुरू होतो. तो दुसऱया ताऱयाच्या प्रभाव क्षेत्राची सीमा येईपर्यंत. 2013 मध्ये व्हॉएजर-1 ने सौरसंकुल सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले ते सोलार इरप्शनच्या वेळचा प्लाझ्मा वेव्ह डेटा तपासला तेव्हा!
व्हॉएजर-1 आणि व्हॉएजर-2 ही खरं तर जुळी भावंडे. परंतु व्हॉएजर-2 हे यान व्हॉएजर-1 च्या 16 दिवस आधी अंतराळात उडाले. या यानांचा प्रदीर्घ काळही त्याचवेळी ठरला होता. व्हॉएजर-1 ने 5 सप्टेंबर 1977 पासून 49 वर्षांहून अधिक काळ अंतराळ प्रवास केला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2027 मध्ये त्याच्या कार्यरत उड्डाणाची सुवर्णजयंती किंवा अर्धशतकपूर्ती झालेली असेल. यापैकी 3 वर्षे 3 महिने आणि नऊ दिवसांचे ग्रहासंबंधीचे प्लॅनेटरी मिशन कधीच पूर्ण केले. आता ते आंतरतारकीय क्षेत्रांत विहार करतेय.
अमेरिकेतील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने बनवलेले अवघ्या 815 किलो वजनाचे हे यान 470 वॉट क्षमतेच्या ऊर्जेवर अंतराळ प्रवास करू लागले होते. अमेरिकेतीलच केप कॅनॅव्हरेल रॉकेट उड्डाण तळावरून ‘टायटन’ रॉकेटद्वारे अंतराळात धाडण्यात आले. त्याने 5 मार्च 1979 रोजी गुरू ग्रहाला 349000 किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घातली. (फ्लाय बाय) त्यानंतर 12 नोव्हेंबर 1980 रोजी शनीची 12 लाख किलोमीटर अंतरावरून परिक्रमा केली. त्यानंतर त्याची अखेरची परिक्रमा घडली ती शनीचा उपग्रह असलेल्या ‘टायटन’भोवती. यावेळी त्याने टायटनच्या वातावरणाचा अभ्यास केला. या उपग्रहापासून व्हॉएजर-1 अवघ्या 6490 किलोमीटर अंतरावरून पसार झाले. यावेळी ‘नासा’पुढे व्हॉएजरच्या ‘फ्लाय बाय’ संबंधी दोन पर्याय होते. एक तर त्याने ‘टायटन’भोवती फेरी मारायची किंवा ‘प्लुटो’ची परिक्रमा करायची. वैज्ञानिकांनी व्हॉएजर-1ला ‘टायटन’ला प्रदक्षिणा घालायला सांगण्याचे कारण म्हणजे, त्यावर बऱयापैकी वातावरण आहे याची आधीच माहिती होती. त्यामुळे या वातावरणजन्य खगोलीय वस्तूचा अभ्यास करणे अधिक अगत्याचे होते.
व्हॉएजर-1चे जुळे भावंड असलेल्या व्हॉएजर-2 या यानाला हेलिओस्फिअरची बाहय़ कडा (आऊटर बाऊण्ड्री) शोधण्याचे कामही होते. व्हॉएजर-1 मात्र पुढे जात 25 ऑगस्ट 2012 रोजी आंतरतारकीय माध्यमात (इन्टरस्टेलर मीडियममध्ये) जाणारे पहिले मानवनिर्मित यान ठरले.
2018 तसेच 19 आणि 25 मध्ये व्हॉएजर-1 चा कार्यकाल वाढवण्यात ‘नासा’ला यश आले. त्यामुळे ते आंतरतारकीय माध्यमातील घडामोडींचा ‘डेटा’सुद्धा पुढची अनेक वर्षं पाठवू शकेल. त्याच्या ‘आरटीजी’ किंवा ‘रेडिओआयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’मधून मिळणारी ऊर्जा त्याला 2036 पर्यंत सहज कार्यरत ठेवेल.
1960 मध्येच ‘नासा’ने सौरमाले- पलीकडच्या आंतरतारकीय अवकाशाचा धांडोळा घेण्याविषयी चर्चा सुरू केली होती. त्याला 1970 च्या दशकात मूर्त स्वरूप येऊ लागले. सुरुवातीला व्हॉएजर-1 हे यान ‘मरीनर-11’ म्हणून उडणार होते. पण पैसा कमी पडल्याने ते केवळ गुरू-शनीला प्रदक्षिणा घालणारे ‘मरीनर- ज्युपिटर- सॅटर्न प्रोब’ म्हणून कार्य करेल असा विचार पुढे आला. मात्र या यानाच्या बांधणीत ‘मरीनर’पेक्षा बराच वेगळेपणा आल्याने त्याचे नाव पुन्हा बदलून ‘व्हॉएजर-1’ असे ठेवण्यात आले.
व्हॉएजर-1 हे एखाद्या बसच्या आकाराचे, पण दहा बाजू (पैलू) ‘डेकॅगोनल’ यान आहे. त्यावर 11 वैज्ञानिक उपकरणे बसवली असून सौरसंकुलाच्या सीमेपर्यंत आणि पुढेही एका 12 फुटी ऍन्टेनाकडून रेडिओ सिग्नल प्राप्त करणार आहे. जेव्हा त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटतो तेव्हा त्यावरच्या ‘डिजिटल टेपरेकॉर्डर’मध्ये 64 मेगाबाईटपर्यंतचा डेटा साठवला जातो आणि नंतर तो पृथ्वीकडे प्रक्षेपित करण्यात येतो. 2025 पासून व्हॉएजर-1चे सिग्नल आपल्यापर्यंत यायला 23 तासांहून अधिक काळ लागत आहे. अशी ही व्हॉएजर-1ची यशस्वी कहाणी ती कुठवर सुफल – संपूर्ण होते ते काळच ठरवेल.





























































