
>> नीलेश कुलकर्णी
राजधानीत सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा शानदार सोहळा झाला. या सोहळ्यात राहुल यांनी त्यांच्या भाषणात ‘अमरिंदर अंकल आपले आवडते नेते’ असल्याचा दाखला दिला. हा दाखला त्यांनी दिला तेव्हा अमरिंदर सिंग सोहळय़ाच्या पहिल्या रांगेत हातात काठी घेऊन बसले होते. अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये परतले तर पंजाबच्या निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. पंजाब प्रदेश काँग्रेसला ‘पालक’ मिळेल व आम आदमीच्या बाजूने एकतर्फी झुकू पाहणारी निवडणूक रंगतदार ठरेल.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग हे सध्या भाजपवासी असले तरी काँग्रेसमध्ये असताना ते राहुल गांधी यांचे आवडते नेते होते. मात्र 2022 मध्ये कोणाच्याही ध्यानीमनी नसताना व सबळ कारण नसताना राहुल गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवले. ते का व कशासाठी? याचे उत्तर राहुल यांच्यासह कोणाकडेही नाही. मात्र या एकाच निर्णयामुळे पंजाबमधील जाट सीख हा आम आदमी पार्टीकडे वळला व काँग्रेसचा पायाच त्यामुळे खिळखिळा झाला. आता अमरिंदर अंकल आयुष्याच्या संध्याकाळी भाजप, ईडी व काँग्रेस अंतर्गत संघर्ष स्वीकारून त्याला टक्कर देतात का, हे यथावकाश कळेलच.
पंजाबची निवडणूक कधी नव्हे ती एकतर्फी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे सध्याच्या घडीला पंजाबमधील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्लीचे व ‘बाहरी’ अशी टीका विरोधक करतात. पंजाब सरकारचा ‘रिमोट’ दिल्लीत आहे, अशी टीका केली जाते. ही टीका टाळण्यासाठी आम आदमी पार्टीने भगवंत मान यांनाच या निवडणुकीसाठीचा प्रमुख चेहरा बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विरोधकांची बोलतीच बंद झाली आहे. ‘मान दा मुनाफा’ या टॅगलाईनखाली मान हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंजाबी जनतेला मिळालेल्या फायद्याची यादीच वाजवून दाखविली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये सगळाच आनंदीआनंद आहे. राहुल यांनी ज्यांना सर्व प्रकारची रिस्क घेऊन मुख्यमंत्री बनवले ते चरणजिंत सिंग चन्नी भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा एक पाय काँग्रेस व एक भाजपमध्ये आहे. दुसरीकडे राजा वाडिंग यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविल्यामुळे पक्षाकडे मजबूत चेहरा उरलेला नाही. अंतर्गत लाथाळ्या व गटबाजीने पक्ष पुरता हैराण आहे. मात्र कॅ. अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये परतल्यास हे चित्र बदलू शकते. अर्थात मुलाची व पत्नीची ईडी चौकशी सुरू असताना हे धाडस अमरिंदर सिंग करतील काय, हाही प्रश्न आहे. भाजपमध्ये आल्यापासून अमरिंदर सिंग बेरोजगार झाले आहेत. भाजपने त्यांना साधे राज्यपाल म्हणूनदेखील नेमलेले नाही. त्यामुळे अमरिंदर अस्वस्थ आहेत. त्यातच अकाली दलासोबत भाजपची पुन्हा युती झाल्यास अमरिंदर सिंग अधिकच अडगळीत पडतील. त्यामुळेच आपले अस्तित्व दाखविण्यासाठी अमरिंदर सिंग सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पंजाबमध्ये भाजपकडे चेहरा नाही. भाजपची भिस्त फक्त हिंदू व शहरी मतदारांवर आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग हे वार्धक्याकडे झुकले असले तरी सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे नेते आहेत.
सुमन दुबेंची करामत
सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग ए जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र सध्या देशविदेशांत गाजते आहे. सोनिया गांधी यांच्या जीवनातील अत्यंत वेधक अशा घडामोडींचा यात उल्लेख आहे. या पुस्तकाच्या जडणघडणीत सोनियांचे जितके योगदान आहे तितकेच सुमन दुबेंचे आहे. सुमन दुबे हे प्रतिथयश पत्रकार. राजीव गांधींचे बालपणीचे मित्र. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आकस्मिकपणे राजीव यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे आली. त्यावेळी आपल्या या विश्वासू मित्राला राजीव यांनी ‘मीडिया अॅडव्हायजर’ म्हणून नेमले. तेव्हापासून सुमन हे राजीव कुटुंबाचेच एक सदस्य बनले. राजीव यांच्या अकाली निधनानंतरही हे सौहार्द कायम राहिले. त्यामुळेच सोनियांनी या पुस्तकाची पूर्ण जबाबदारी सुमन दुबेंवर सोपवली. या पुस्तकाचे मुखपृष्ठ ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या धाटणीतले आहे. हे मुखपृष्ठ पाहून राहुल व प्रियंका हे तर सुमन अंकलच्या अदाकारीने हरखूनच गेले होते. दोन-तीन वर्षांपासून सुमन दुबे या पुस्तकावर मेहनत घेत होते. त्यात सरकारी अवकृपेने पहिला प्रकाशक पळून गेला. दुसरा दुबेंनी शोधला व अखेरीस ते प्रकाशित झाले.
अखिलेश व विजय यांना ‘मानाचे पान’
सोनियांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा या ना त्या कारणाने गाजत राहिला. काँग्रेसने या कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव व तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना मानाचे पान वाढले. या कार्यक्रमाच्या पहिल्या रांगेत अगदी सोनियांच्या शेजारी अखिलेश व त्यांची पत्नी डिंपल होत्या तर राहुल यांच्या शेजारी विजय. त्याशेजारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व त्यांची पत्नी, त्या पलीकडे अमरिंदर अंकल व थोडे बाजूला अब्दुल्ला पिता-पुत्र व ओमर यांच्या नव्या पत्नी निधी राजदान. राजदान या पूर्वाश्रमीच्या पत्रकार असल्याने त्यांना पहिल्या रांगेत पाहून इतर काँग्रेसजनांच्या पोटात जितका मुरडा पडला नसेल त्याहून अधिक तो पत्रकारांच्या पोटात पडला! काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री दुसऱया रांगेत. काही घटक पक्षाचे आजी-माजी मुख्यमंत्री वेगळय़ा रांगेत होते. या कार्यक्रमातील ‘बैठक रचना’ ही सांकेतिक मानावी लागेल. उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाल्यास 2029 मध्ये दिल्ली पुन्हा काबीज करण्याच्या भाजपच्या मोहिमेला मोठा धक्का बसू शकतो. राहुल गांधी व अखिलेश यांनी एकत्रित निवडणूक लढल्यास उत्तर प्रदेशात परिवर्तन अटळ आहे. ही बैठक व्यवस्था एकप्रकारे निवडणूकपूर्व युतीचे संकेत देणारी होती!





























































