
माहीम कॉजवे पुलाची पुनर्बांधणी आणि रुंदीकरण प्रकल्पातील अडथळा अखेर दूर झाला आहे. या प्रकल्पाच्या कामात येणारी दहा बांधकामे पालिकेने हटवली आहेत. त्यामुळे गेल्या सहा ते सात वर्षांपासून असलेला महत्त्वाचा अडथळा ‘जी उत्तर’ विभागाच्या कार्यवाहीमुळे दूर झाला आहे.
माहीम कॉजवे हा दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाची प्रस्तावित पुनर्बांधणी आणि रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. याशिवाय मिठी नदीची जलवहन क्षमता वाढविणे आणि नदीतील पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत होण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने सदर निष्कासन कारवाई एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन आणि त्यासंबंधित अन्य मुद्दय़ांमुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब होत होता. त्यामुळे ही निष्कासनाची कारवाई प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. उप आयुक्त प्रशांत सपकाळे आणि ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या निष्कासन कारवाईत परिरक्षण भागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.



























































