सिग्नल न मिळाल्याने विमान हवेतच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

खराब हवामानाचा फटका आज शनिवारी पुन्हा एकदा हवाई सेवेला बसला. विमानतळावरून विमानाला खाली उतरण्यास तब्बल १५ मिनिटे सिग्नलच मिळाले नाही. त्यामुळे विमानातील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. १५ मिनिटानंतर जेव्हा सिग्नल मिळाले आणि विमान सुरक्षितपणे लॅण्ड झाले तेव्हा कुठे विमान प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वारे वाहू लागले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. रस्त्यावरचे दिसेनासे झाले होते. अशातच सायंकाळी ४.३० वाजता मुंबईहून संभाजीनगरला जेट एअरवेजचे विमान आले. विमानतळावर विमान उतरण्यासाठी विमानतळाच्या वर घिरट्या घालू लागले. परंतु, पायलटला ढगाळ हवामानामुळे सिग्नल दिसतच नव्हते.

विमानतळावरून विमानाला सिग्नलच मिळत नसल्याने तब्बल १५ मिनिटे विमान हवेतच शहरावर घिरट्या घालत राहिले. १५ मिनिटानंतर सिग्नल मिळाले. त्यानंतर पायलटने विमान लॅण्ड केले. नंतर याच विमानाने मुंबईला जाणारे प्रवासी घेऊन वेळेत उड्डाण केले. खराब हवामानामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला गेल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.