
रंगीबेरंगी कपडे, डोळय़ांवर गॉगल, गळय़ात टाय अशा थाटात वॉक करणारे श्वान आणि मांजरी सर्वांच्या नजरेत भरत होते. निमित्त होते बोरिवली पचिमेकडील आयसी कॉलनी पेट पार्कमध्ये आयोजित केलेल्या ‘समर पेट 2022’ या स्पर्धेचे. या स्पर्धेमध्ये 300 हून अधिक श्वान सहभागी झाले होते. या श्वानांसाठी विविध स्पर्धा, व्यक्तिमत्त्व विकास आदी स्पर्धांचे आयोजन केले होते.
ओल्ड वाईस ओक मीडिया तसेच शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये मोठय़ा संख्येने प्राणीमित्र सहभागी झाले. प्राणिमात्रांविषयी प्रेम-आपुलकी निर्माण करण्यासाठी असा उपक्रम सर्वत्र राबवणे गरजेचे असल्याचे मत मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात माँ फाऊंडेशनच्या वतीने भटक्या श्वान तसेच लहान पिलांसाठी दत्तक योजना आयोजित करण्यात आली. याप्रसंगी एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना रस्त्यावरील श्वान व मांजरीसाठी रुग्णालय तसेच निवारा उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच एमएचबी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विनायक वरघडे यांनादेखील रस्त्यावरील श्वान व मांजरीसाठी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोन्सा, युवासेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकरसहित प्राणीमित्र मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘ओल्ड वाईस ओक मीडिया’चे नितीन दिवेकर यांनी केले. दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून पाळीव श्वान व मांजरींसाठी मुंबईतील पहिली स्मशानभूमी दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा भागात बांधण्यात येत आहे.






























































