लग्नात करीमच्या जागी पोहोचला रहीम, नवरीकडच्यांनी बनवले बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । रांची

झारखंडमध्ये एका व्यक्तीचा तिसरे लग्न करण्याचा प्रयत्न त्याच्या भावाला चांगलाच महागात पडला आहे. करीम असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याचा भाऊ रहीमला मुलीकडच्या नातेवाईकांनी बंदी बनवून ठेवले आहे. जोपर्यंत लग्नाचा संपूर्ण खर्च करिम परत करत नाही तोपर्यंत त्याच्या भावाला सोडणार नसल्याचा पवित्रा मुलीकडच्यांनी घेतला आहे.

त्याचे झाले असे की, करीमच आधीच दोन लग्न झाली आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून करीम त्या दोघींसोबत एकाच घरात राहतोय. मात्र दोन लग्न करून देखील घरात पाळणा हलत नसल्याने करीमने तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलगी बघून त्याने लग्नाची तारीख निश्चित देखील केली. मात्र वाजत गाजत वरात घेऊन जाणाऱ्या करीमला त्याच्या दोन्ही बायकांनी जबरदस्त धक्का दिला. त्या दोघींनीही करीम विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे करीमला त्याच्या वरातीतून पोलिसांनी अटक केली. मात्र त्याने लग्न मोडू नये म्हणून त्याच्या जागी भावाला सेहरा घालून लग्नाला पाठवले. मात्र लग्नाच्या विधी सुरू असताना मुलीकडच्या नातेवाईकांना नवरा मुलगा हा दुसराच कुणीतरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी नवऱ्याला मुलाला याबाबत हटकले असता तो नवऱ्याचा भाऊ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर रहीमने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे संतापलेल्या मुलीकडच्यांनी रहीम व त्याच्या काही नातेवाईकांना घरात डांबून  ठेवले असून जोपर्यंत करीम लग्नाचा संपूर्ण खर्च परत करत नाही तोपर्यंत रहीमला सोडणार नसल्याचे सांगितले आहे.