
सामना ऑनलाईन, इताहनगर/नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेश येथील घनदाट जंगलाच्या मेनचुका परिसरातून बेपत्ता झालेल्या हिंदुस्थानी हवाई दलाच्या ‘एएन-32’ या विमानाचा मंगळवारी दुसऱ्या दिवशीही ठावठिकाणा लागला नाही. अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांवर ‘इस्रो’च्या सॅटेलाईटद्वारे शोधमोहीम हाती घेण्यात आली, मात्र त्यानंतरही बेपत्ता विमानाचा शोध लागू शकला नाही.
नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले की, तामिळनाडूतील अराकोणम येथील ‘आयएनएस राजली’वरून नौदलाच्या ‘पी-8आय’ या विमानाने मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास उड्डाण घेतले आणि शोधमोहिमेत सहभाग घेतला. त्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरची टीम तैनात ठेवली आहे. ‘पी-8आय’ हे विमान इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि रेड सेन्सॉरच्या साहाय्याने बेपत्ता विमानाचा शोध घेणार आहे.
चीनच्या सीमेजवळील मेनचुकासाठी सोमवारी दुपारी आसाममधील जोरहात येथून उड्डाण घेतलेले विमान पुढील 33 मिनिटांतच बेपत्ता झाले. या विमानात 13 प्रवासी होते. ‘पी-8आय’ या विमानात अत्यंत शक्तिशाली ‘सिन्थेटीक ऍपेर्चर रडार’ आहे, असे कॅप्टन शर्मा यांनी ट्विट केले. सध्या ढगाळ वातावरणात सु-30एमकेआय, सी-130जे सुपर हर्क्युलस आदींच्या साहाय्याने बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे.



























































