आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – आमदार हसन मुश्रीफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र रचलेले आहे. यातील एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे प्रत्युत्तर आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. राजकीय द्वेषातून माझी, माझ्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची बदनामी सुरूच आहे. मात्र, शेतकऱयांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका, असे खडेबोल त्यांनी सुनावले.

आमदार मुश्रीफ यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, काल किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा बेताल, खोटी आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवणारी जी वक्तव्ये केली त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. शेतकऱयांच्या शेअर्सच्या पैशावर आम्ही तारणावर कर्ज घेतले. त्यानंतर शेतकऱयांच्या पैशांवर नातेवाईकांना कर्ज दिली, अशा प्रकारचे अनेक खोटे आरोप केले आहेत. उलट कारखान्याच्या शेअर्ससाठी आम्ही आवाहन केल्यानंतर इतके पैसे कमी दिवसांत जमू शकतात हे एक आगळवेगळं उदाहरण आहे. आम्ही त्या शेअर्सपोटी सवलतीच्या दरात दर महिन्याला पाच किलो साखर, खते, बी-बियाणे देतो. त्याशिवाय सभासदांचा ऊस अग्रक्रमाप्रमाणे नेतो. आता मी जर आवाहन केले तर एक महिन्यात शंभर कोटी रुपये जमू शकतात, असे यापूर्वीच सोमय्या यांना सांगितले होते. एवढा माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि परमेश्वराच्या कृपेने कोणत्याही संकटाला पार करू, असा विश्वास व्यक्त करत, यातील एकही गोष्ट जर खरी असेल तर आपण आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

कारखानदारीत शेतकऱयांचे 10 हजार रुपयांप्रमाणे शेअर्स उभे करून उर्वरित राष्ट्रीयकृत पाच बँकांची कर्जे काढून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आमच्या तीन मुलांनी उभा केला आहे. यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही, असे मी सांगितले होते. आता जे 40 हजार शेतकऱयांच्या नावावर दहा हजार रुपयेप्रमाणे शेअर्स घेतलेले आहेत आणि ते 2010-11, 2011-12, 2012-13 जर ते कारखान्याच्या उभारणीस खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची गरज काय ? आणि शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान खासगी कारखान्यांना मिळत नाही, याची त्यांना माहिती नसावी, याचे आश्चर्य वाटते. माझी बदनामी करण्यासाठीच हे षडयंत्र सुरू असून, काही दिवसात यामागे असणाऱया बोलवित्या धन्यांना उघडं केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिला आहे.

माझ्यावर व्यक्तिगत काहीही आरोप करू देत; पण जिल्हा बँक आम्ही रक्त आटवून यशोशिखरावर पोहोचविली आहे. आज संपूर्ण राज्यात गवगवा आहे. शेतकऱयांच्या मालकीच्या बँकेला बदनाम करण्याचे पाप ही मंडळी करत आहेत. शेतकरी त्यांना माफ करणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

भाजपला मानणारे कोरे यांना शिंदे गटाला भेटायला पाठवू

 केडीसीसी बँकेतून एक पैशाचेही मी स्वतः कर्ज घेतलेले नाही. एक पैशाचेही माझ्या नातेवाईकांना कर्ज दिले नाही. कारखान्यामध्येही बेकायदेशीर कर्ज दिलेले नाही. यामधील कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकल्यास आपण आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. यापुढे त्यांनी व्यवस्थित माहिती घ्यावी. आमदार विनय कोरे, शिंदे गट व भाजपला मानणारे  जिल्हा बँकेमध्ये संचालक आहेत. कोरे यांना आपण शिंदे गटाकडे पाठवणार आहे. आमचे युनियनचे पदाधिकारीही त्यांना भेटणार आहेत. त्यांचे जे गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कर्जामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त आरोपापोटी माझे कुटुंबीय व नातेवाईक, मित्र यांच्यावर इन्कमटॅक्स, आर.ओ.सी., ईडीचे सातत्याने छापे घातले जात आहेत. हे जागतिक रेकॉर्ड होईल, असे वाटत असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.