सहावीतील विद्यार्थिनीला केली होती बेदम मारहाण; शिवसेनेच्या दणक्यानंतर मारकुट्या शिक्षिकेने मागितली लेखी माफी

खारघरमधील जिल्हा परिषदेत सहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. ही बाब समोर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवर धडक दिली. संतप्त शिवसैनिकांनी प्रशासन आणि शिक्षिकेला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर मारकुट्या शिक्षिकेने लेखी माफी मागितली.

दोन दिवसांपूर्वी शिक्षिकेने विद्यार्थिनीला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. याबाबत घरी काही सांगू नको असा दमही तिने विद्यार्थिनीला दिला. मात्र अंगावर उमटलेले वळ पाहून तिच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर विद्यार्थिनी ढसाढसा रडू लागली आणि तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या अंगावरील वळ पाहून संतापलेल्या पालकांनी न्यायासाठी शिवसेना कार्यालय गाठले. शिवसेना महानगरप्रमुख अवचित राऊत यांनी सर्व घटना समजून घेत शिवसैनिकांसोबत शाळेवर धडक दिली. यावेळी महानगर संघटक गुरुनाथ पाटील, उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे, प्रशांत जांभूळकर, शाखाप्रमुख संतोष कटीमनी, शहर युवाधिकारी निखिल पानमंद, अश्विन ससाणे, आशुतोष जवळकर आदी उपस्थित होते.

प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना
शिवसैनिकांनी शाळेचे प्राध्यापक सुनील बंडगर यांच्यासमोर मारकुट्या शिक्षिकेला चांगलेच खडसावले. तिच्याकडून लेखी माफीनामाही घेतला. यापुढे असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांनी प्राध्यापकांना दिल्या. सदर घटनेबाबत खंत व्यक्त करत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी प्राध्यापकांनी शिवसैनिकांना दिले.