
सामना प्रतिनिधी । लातूर
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदित्य संवाद कार्यक्रमाची लातूरकरांना लागलेली उत्सुकता आज संपली. लातुरात आदित्य संवादला जोरदार प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन युवक – युवतींची मने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी जिंकली.
दयानंद सभागृहात आदित्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या परिसरातील संपूर्ण वातारवरण अतिशय उत्साही होते. महाविद्यालयीन युवक युवतींनी सभागृह खचाखच भरलेले होते. पाय ठेवण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. सभागृहात आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. लातुरातील युवकांचा उत्साह पाहून मलाही एनर्जी मिळाली असे प्रारंभीच सांगून आदित्य ठाकरे यांनी थेट संवादास प्रारंभ केला.
मराठवाड्याचा दुष्काळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, शिवसेना संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रयत्नशील आहे. सरसकट कर्जमाफी करुन घेणार म्हणजे घेणारच असा ठाम विश्वासही त्यांनी दिला. सध्या सरकारची राजकीय मेगा भरती जोरात सुरु आहे. लवकरच शासकीय मेगा भरतीही होईल असेही त्यांनी सांगितले. मुलींना शाळेत, महाविद्यालयात पाठवलेच पाहिजे. तसेच नौकरी करुन स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे हा त्यांचा जन्मसिध्द हक्कच आहे. तिला कुणीही हात लावता कामा नये असेही त्यांनी म्हटले.


























































