
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध खाजगी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. सर्व नागरिकांचे कोविड 19 लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लसीकरणाशिवाय या आजाराचा धोका कमी होणार नाही. लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एच एन रिलायन्स फाऊंडेशनच्या सौजन्याने मुंबईत दीड लाख नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळी कोळीवाडा येथे करण्यात आला.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईची लोकसंख्या विचारात घेता येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेसोबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. या मोहिमेत खाजगी रुग्णालये आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीचा उपयोग करून लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रिलायन्स फाऊंडेशन स्वतःहून पुढे आले असून त्यांच्या सौजन्याने ही मोहीम राबविली जात आहे.
महाराष्ट्र हे एक कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे राज्य आहे. तथापि इतरही राज्यांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. तोपर्यंत कुणीही सुरक्षित होणार नाही. मुंबईत सुमारे 55 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी दुसरा डोसही वेळेत पूर्ण करावा, तसेच कोविडबाबतच्या नियमांचे आवर्जून पालन करावे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.
कोविड 19 नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक करून आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, रिलायन्स फाऊंडेशनच्या डॉ.तरंग आदी उपस्थित होते. यानंतर या मोहिमेअंतर्गत सायन कोळीवाडा येथील प्रतीक्षानगर शाळा संकुलात आयोजित लसीकरण शिबिरासही आदित्य ठाकरे यांनी भेट देत पाहणी केली.
आरे वसाहतीचा शाश्वत विकास करणार – आदित्य ठाकरे
आरे वसाहतीतील अनुसूचित जमातीच्या रहिवाशांसाठी खावटी अनुदान योजनेतंर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले होते. यावेळी वसाहतीतील रहिवाशांसाठी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खांबाचा पाडा येथे त्याचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील काही दिवसांत सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी एकही आदिवासी बांधव यापासून वंचित राहणार नसल्याचे आश्वसन दिले. त्याचबरोबर आरे वसाहतीचा शाश्वत विकास केला जाणार असून मुख्य रस्त्याचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून येत्या ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.
































































