
राजकीय हेतूने ही कारवाई होत आहे असे स्पष्ट दिसत आहे. सूडाच्या राजकारणाची भावना घेऊन हे सर्व सुरू आहे!
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईबद्दल भाष्य करताना शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘देशात लोकशाही राहिली आहे का?’ अशी प्रतिक्रिया दिली. सध्या देशात जे काही सुरू आहे ते लोकशाहीचे, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुण्यात पर्यायी इंधन परिषदेच्या समारोपानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘‘राजकीय हेतूने ही कारवाई होत आहे असे स्पष्ट दिसत आहे. सूडाच्या राजकारणाची भावना घेऊन हे सर्व सुरू आहे,’’ असंही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.
‘‘ठराविक एका पक्षाला मतदान केले नाही तर तुमच्यामागे चौकशी लावू, अशी धमकी दिली जाते. जनतेला अशी जाहीर धमकी देऊ लागले तर देशात लोकशाही आणि न्यायप्रक्रिया राहिली आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे. देश कोणत्या दिशेने चालला आहे याचा विचार करणे गरजेचे आहे,’’ असेही ते म्हणाले. शिवसैनिक आणि महाविकास आघाडी ही एकजुटीने एकमेकांसोबत भक्कमपणे उभी असल्याचेही ते म्हणाले.
























































